धाराशिव : प्रतिनिधी
मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ धाराशिव जिल्ह्यात मराठा समाज युवकांनी सोमवारी (दि.२२) धाराशिव शेजारील हातलाई तलावात उतरुन सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये एका आंदोलनकर्त्याच्या तोंडात पाणी जावून त्याची प्रकृती खालावली.
त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आनखी ७ जण अद्यापही पाण्यात असून पोलिसासह प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांना पाण्याच्या बाहेर येण्यास विनंती करण्यात येत आहे. मात्र आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून मराठा युवक आक्रमक होत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत असून आनखी काहीजण पाण्यात उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या आंदोलनाच्या समर्थनार्थ शहरातील बार्शी नाका भागात मराठा युवकांनी रस्तारोको आंदोलन सुरु केले आहे. यामुळे वाहतूकही खोळंबली असून आंदोलन चिघळण्याचे चित्र निर्माण झाले आहे.