30.1 C
Latur
Sunday, March 30, 2025
Homeमहाराष्ट्रशोषणावर आधारीत व्यवस्था संपवण्याची गरज

शोषणावर आधारीत व्यवस्था संपवण्याची गरज

भविष्यातील संकट ओळखून लढा द्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी
कामगार संघटना एकेकाळी मोठी शक्ती होती. आपल्या हक्कांसाठी चक्का जामचा नारा दिला तर बंद होत होता, पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अनेक उद्योग बंद पडत आहेत. तर जे आहेत त्यात आऊटसोर्सिंग तसेच कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जात असून यातून शोषणाचे प्रमाण वाढत आहे.

हे शोषण फक्त शहरात होत नाही तर ते गावखेड्यापर्यंत पोहचले आहे. ही शोषणावर आधारीत व्यवस्था संपवण्याची गरज आहे. त्यासाठी भविष्यातील संकटे ओळखून संघटीतपणे लढा द्या, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी येथे केले.

राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या राज्यस्तरीय संमेलनात बोलताना सपकाळ म्हणाले, आधी उद्योगपती होते, आता व्यापारी झाले आहेत. हे व्यापारी फक्त नफ्यासाठी काम करत असून त्यांना कामगारांच्या कल्याणाचे काहीही देणेघणे नाही. मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणांमुळे देशात श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे तर गरिब अधिक गरिब होत चालला आहे. पण देशाच्या पंतप्रधानांना गरिबांची चिंता नाही. केंद्र आणि राज्यातील सरकार हे गरिब, कष्टकरी, कामगारांच्या विरोधातील आहे.

मोदी सरकारचा कारभार म्हणजे ‘दाल में कुछ काला’ नाही तर अख्खी डाळच काळी आहे. त्यांची नियत खोटी आहे आणि निती तर नाहीच. अशा शक्तीविरोधात आपल्याला लढायचे आहे. कामगारांचे शोषण होत असताना आपण शांत बसून चालणार नाही. त्यामुळे कृती कार्यक्रम घेऊन काम करा आणि मोठी चळवळ उभी करून एकत्र येऊन लढा द्या असे आवाहनही सपकाळ यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR