परभणी : बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या मन विषन्न करणारी घटना असून यातील सर्व दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्रात लातूर, जालना, छत्रपती संंभाजीनगरसारख्या शहरात घडलेल्या भीषण घटना पाहता अमानवीय पध्दतीने मारहाण करून दहशत निर्माण करण्याची प्रवृत्ती फोफावत असल्याचे दिसून येत आहे. हे रोखण्यासाठी सर्व सुज्ञ मंडळींनी पक्ष व जातभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले.
परभणी शहरातील जिल्हा क्रीडा संकुलासमोरील चौकात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याशेजारी नियोजित जागी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे रविवार, दि. ९ मार्च रोजी लोकार्पण प्रसंगी ज्येष्ठ नेते भुजबळ बोलत होते. यावेळी मंत्री अतुल सावे, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, ओबीसी नेते छगन भुजबळ, आ. राजेश विटेकर, आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, आ. डॉ. राहुल पाटील, माजी आ. सुरेश वरपुडकर, माजी आ. बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, सीईओ नतिशा माथूर, मनपा आयुक्त धैर्यशिल जाधव, डॉ.विवेक नावंदर, शिवसेना नेते आनंद भरोसे, प्रताप देशमुख आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ज्येष्ठ नेते आ. भुजबळ म्हणाले, लातूर येथे धनगर समाजातील युवकास झालेली बेदम मारहाण, जालना येथे एका मुलाला व छत्रपती संभाजीनगरात महिलेस क्रूर पध्दतीने झालेल्या मारहाणीच्या घटना पाहता राज्यात काय चालले आहे कळत नाही. आता खोक्या दादाचे व्हीडीओ समोर आले आहेत. एखाद्याला अमानुषपणे मारहाण करून दहशत निर्माण करण्याची अपप्रवृत्ती वाढीस लागत आहे. हे वेळीच रोखून अशा प्रवृत्ती नष्ट करायला हव्यात. त्यासाठी सर्वांनीच अन्याय, अत्याचार विरोधात आवाज उठवला पाहिजे असेही ज्येष्ठ नेते भुजबळ यांनी सांगितले.
१ मे रोजी भिडेवाड्याचे उद्घाटन
महायुती सरकारने हाती घेतलेले भिडेवाड्याचे काम सुरू असून १ मे रोजी स्मारकाचे उद्घाटन होईल. हे काम युती सरकारच्या काळातच मार्गी लागत आहे. महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वाड्याचेही काम सुरू असून त्यासाठी २०० कोटींची तरतूद केलेली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी १३३ कोटीचा विकास आराखडा केला जात आहेत असेही त्यांनी सांगितले.
दोषींवर कारवाई झालीच पाहिजे
कायदा सर्वांना सारखाच आहे. परभणी शहरातील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येची उच्चस्तरीय अधिका-यांकडून चौकशी करण्यात यावी. तसेच प्रकरणातील दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आपण नुकतीच केली असल्याची माहिती जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सुर्यवंशी कुटुंबाच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे.
पोटचा गोळा गेला : सुर्यवंशी
आ. भुजबळ परभणी शहरात आले असता त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. या वेळी मयत सूर्यवंशी यांच्या मातोश्री यांनी आपल्या पोटचा गोळा आम्ही गमावला आहे. अहोरात्र मेहनत करीत आम्ही कुटुंबीयांनी त्यास शिकविण्यासाठी प्रयत्न केले. सोमनाथ सूर्यवंशी वकिलीची परीक्षा देणार होता. त्यादृष्टीने त्यांनी आपले प्रयत्न सुध्दा सुरू केले होते. परंतू पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ यांचा मृत्यू झाला आहे असे सुर्यवंशी कुटुंबियांनी सांगितले.