सुभाष कदम
धाराशिव : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून उस्मानाबाद मतदारसंघाची व्याप्ती लक्षात घेता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी अगदी कमी वेळ मिळत आहे. त्यामुळे उमेदवारांची अवस्था रात्र थोडी… सोंगे फार, या म्हणीप्रमाणे झाली आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ हा उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या तीन जिल्ह्यांत विस्तारलेला आहे. यामध्ये उस्मानाबाद-कळंब, परंडा, तुळजापूर, उमरगा, लातूर जिल्ह्यातील औसा व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. येणा-या लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघात दि. ७ मे रोजी मतदान होत आहे. एकूण २ हजार १३९ मतदान केंद्रांवर २० लाख ८ हजार ९२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दि. १२ एप्रिलपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुती अशी थेट दुरंगी लढत होत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर तर महायुतीच्या (अजित पवार गट) उमेदवार भाजपाचे आमदार राणाजगजिसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवारांना केवळ १५ ते २० दिवसांचा कालावधी प्रचारासाठी मिळणार आहे. सध्या कडक उन्हाळा जाणवत असून वाढत्या तापमानामुळे उमेदवारांकडून सकाळी व सायंकाळी प्रचार केला जात आहे. मतदारसंघाची मोठी व्याप्ती लक्षात घेता मतदारसंघातील प्रत्येक गावात पोहोचणे उमेदवारांना शक्य नाही. त्यामुळे त्यांना त्या-त्या भागातील राजकीय नेते, कार्यकर्त्यांच्या भरोशावर रहावे लागत आहे. एकमात्र नक्की, उमेदवारांची अवस्था रात्र थोडी… सोंगे फार, या म्हणीप्रमाणे झाली आहे.