जळगाव : जळगाव विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांचे शिलेदार भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा मोठा विजय झाला आहे.
मतमोजणीला सोमवारी (दि. २२ ) सकाळी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुरुवात झाली. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यात थेट लढत झाली. नंदकिशोर महाजन यांना ५२८ मते मिळाली तर विरोधी उमेदवार शरद तायडे यांना केवळ १७ मते मिळाली. ५११ मतांनी नंदकिशोर महाजन यांचा विजय झाला.
या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले होते. दोन्ही गटाकडून विजयाचे दावे केले जात होते. मात्र, प्रत्यक्षात नंदकिशोर महाजन यांनी पूर्णपणे एकतर्फी ही निवडणुक जिंकली. मतमोजणी प्रक्रियेत अगदी प्रारंभीपासूनच महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी आघाडी घेतली होती. त्यांना पहिल्याच फेरीत तब्बल ५७७ मतांचा आकडा गाठता आल्याने दुस-या पसंतीक्रमाची मते न मोजताच विजयी घोषीत करण्यात आले. विधान परिषदेच्या निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांनी एकतर्फी विजय संपादन केल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
जळगाव विधान परिषद
एकूण मतदान : ६३०
झालेले मतदान : ६१६
अवैध मते : ०५
विजयासाठी आवश्यक कोटा : ३०६
नंदकिशोर महाजन : ५८२
शरद तायडे : १७
अनिल चौधरी : ११
रेश्मा काळे : ०१
या निवडणुकीत शिवसेनेच्या अपक्ष उमेदवार रेश्मा काळे यांनी बंडखोरी केली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरुन त्यांनी माघार घेतली. या निवडणुकीत रेश्मा काळे यांना केवळ १ मते पडली आहे. याचाच अर्थ त्यांनी महायुतीचा धर्म पूर्णपणे पाळला.
तर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनीही निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी माघार घेतली होती. त्यांना केवळ ११ मते पडली आहेत. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना भाजप, शिवसेना शिंदे गट आणि मित्रपक्षांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांचा मोठा विजय झाला आहे.
















