22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईच्या विकासाचा वेग चकित करणारा

मुंबईच्या विकासाचा वेग चकित करणारा

मुख्यमंत्र्यांनी दिली प्रदूषण नियंत्रण, महिला सक्षमीकरणाची माहिती

मुंबई : आज भारताच्या प्रजासत्ताक दिनी मुंबईतल्या वातावरणातला जिवंतपणा, चैतन्य आणि विशेषत: तरुणांचा उत्साह याचा अनुभव घेतल्याने मी खरोखरच प्रभावित झालो आहे, अशा शब्दांत संयुत राष्ट्र संघाच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आज झालेल्या चर्चेत आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबईत ज्या झपाट्याने पायाभूत सुविधा, गृहनिर्माण विकास सुरू आहे तो देखील चकित करणारा आहे असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी संयुक्त राष्ट्र अधिकारी व प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमवेत एक बैठक झाली.

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी डेनिस फ्रान्सिस यांना गणपतीची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या बैठकीस संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत रुचिरा कंभोज, स्टीव्हन फिलिप, कैशा मॅकग्वेरे, स्नेहा दुबे, स्टीव्हन फिलिप, शॉम्बी शार्प, हम्मा मरियम खान उपस्थित होते.

तर राज्य शासनातर्फे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, परराष्ट्र मंत्रालयाचे राजेश गावंडे, मनपा अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे हे देखील बैठकीत सहभागी झाले होते.

यावेळी डेनिस फ्रान्सिस यांनी आपल्या त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाच्या भारताशी पूर्वापार असलेल्या संबंधाला उजळणी दिली. ते म्हणाले की, त्रिनिदाद असेंब्लीमध्ये असलेले सभापतींचे आसन हे भारताने भेट म्हणून दिलेले असून या आसनाच्या साक्षीने अनेक चांगल्या घटना घडल्या आहेत.

महिला सक्षमीकरण
प्रारंभी शिष्टमंडळाचे स्वागत करून मुख्यमंत्री म्हणाले की, संयुक्त राष्ट्राच्या दृष्टीने प्राधान्याचा असलेला हवामान बदलाचा विषय महाराष्ट्रात देखील महत्त्वाचा आहे. आमचे शासन पर्यावरणपूरक विकासावर भर देणारे असून शाश्वत विकास हेच ध्येय आहे. प्लास्टिकवर बंदी, बांबू लागवड, ग्रीन हायड्रोजन धोरण तसेच मुंबईत सुरु असलेली डीप क्लिनिंग मोहीम अशी पाऊले टाकून पर्यावरण संरक्षण करीत आहोत असे ते म्हणाले. महिलांच्या बचत गटांना अधिक सक्षम करीत आहोत तसेच ‘लेक लाडकी’सारख्या योजनेतून मुलींचे कल्याण करण्यात येत आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR