नवी दिल्ली : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या नीट पीजी परीक्षेवरुन देशभरात सध्या मोठा गदारोळ सुरु आहे. २२ जून रोजी नीट परीक्षेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही तासांआधीच परीक्षा पुढे ढकल्याचे जाहीर केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून त्याचे धागेदोरे अनेक राज्यांमध्ये पसरल्याचे समोर येत आहे. केंद्र सरकारकडून यासंदर्भात कठोर पावले देखील उचलण्यात आली आहेत. दुसरीकडे आता राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी देखील या प्रकरणाची दखल घेत प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त भाषणात नीट पेपर फुटीबद्दल भाष्य केले. पेपर फुटीबाबत कठोर पावले उचलली जाणार असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. आमचे सरकार देशातील प्रत्येक तरुणाला मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करण्यात गुंतले आहे असेही राष्ट्रपती म्हणाल्या. राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी नीट-नीटच्या घोषणा दिल्या. त्यानंतर राष्ट्रपतींना विरोधकांना माझं म्हणणे ऐकून घ्या असे म्हणावे लागले.
माझे सरकार निष्पक्ष तपास करण्यासाठी आणि नुकत्याच झालेल्या काही परीक्षांच्या पेपरफुटीच्या दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी वचनबद्ध आहे. याआधीही अनेक राज्यांमध्ये पेपरफुटीच्या घटना घडताना आपण पाहिल्या आहेत. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या प्रश्नावर देशव्यापी उपाययोजना करण्याची गरज आहे. परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात संसदेने कठोर कायदा केला आहे. परीक्षांशी संबंधित संस्था, त्यांचे कामकाज, परीक्षा प्रक्रिया यासह सर्व सुधारणा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू म्हणाल्या.
पूर्वी विद्यार्थी फक्त भारतीय भाषेतच शिक्षण घेत असत आणि त्यांच्यावर अन्याय होत असे. माझ्या सरकारने नवीन शैक्षणिक धोरण राबवून हा अन्याय दूर करण्याचे काम केले आहे. तरुणांना भारतीय भाषेत अभियांत्रिकी शिकण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. देशात ७ नवीन आयआयटी, १६ आयआयएम, ३१५ वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत. सरकार या संस्थांना बळकट करत आहे असेही राष्ट्रपती म्हणाल्या.