मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार, अशी मागच्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असताना केंद्र सरकारच्या अधिकृत पत्रात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाच्या पुढे पक्षाचा उल्लेख एनसीपी(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) असा केल्याने या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यासाठी परदेशात जाणा-या सर्वपक्षीय खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश केला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या पत्रकात एनसीपी-एसपी ऐवजी केवळ एनसीपी असा उल्लेख असल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पक्षाचा उल्लेख संसदीय कामकाजात एनसीपी-एसपी असा उल्लेख केला जातो. पण आता त्याच्या नावासमोर केवळ एनसीपी असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबतचा निर्णय आता खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीच घ्यावा असे धक्कादायक विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना पुण्यात केले होते. त्यामुळे राजकीय भूकंपाच्या शक्यतेवर जोरदार चर्चा सुरु झाली होती.
त्याचबरोबर एका इंग्रजी वर्तमानपत्राला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केले होते. आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन मतप्रवाह असल्याचेही त्यांनी सांगितले होते. एका गटाला वाटते आम्ही एकत्र यावे, तर दुस-या गटाला वाटते की, स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवावे. त्याबाबत छेडले असता पवार म्हणाले की, एकत्र यायचे की नाही, पुढे कसे जायचे, हे आता खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनीच ठरवावे.
यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना जर शरद पवार साहेब याबद्दल बोलले असतील, तर मी याच्याबाबत काय बोलणार असे म्हणत माध्यमांच्या प्रश्नाला बगल दिली होती. तर शरद पवार आणि पत्रकारांची अनौपचारिक काय चर्चा झाली, हे मला माहिती नाही. किंवा कुठलाही आम्हाला संदेश आलेला नाही. त्यामुळे यावर आम्ही काहीही बोलू शकत नाही. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाल्यावर आम्हाला यावर बोलता येईल, अशी प्रतिकिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिली होती.
भारताने पाकिस्तानला संपूर्ण जगासमोर उघडे पाडण्याची तयारी केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकार आता पाकिस्तानची पोलखोल करणार आहे. यासाठी मोदी सरकारने ७ सदस्यांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन केले आहे. पहलगाम हल्ला आणि त्यानंतर त्याचा बदला म्हणून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबतच्या पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करण्यासाठी हे शिष्टमंडळ महत्त्वाच्या देशांना भेटी देईल. मोदी सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यÞात आला आहे.