नवी दिल्ली : विरोधकांना नजरअंदाज करून सरकार कारभार करू पाहत आहे. देशातील जनता सगळे पाहत आहे, सरकारला याची किंमत मोजावी लागेल असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. संसदेच्या कामकाजावेळी विरोधी पक्षांच्या १४४ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणी दिल्लीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत सरकारविरोधात मोर्चा काढला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली.
खासदारांची एकच मागणी होती की, चार-पाच दिवसांपूर्वी जे लोक संसदेत घुसले, ते लोक संसदेचे सदस्य नव्हते. ते सभागृहात कसे आले? त्यांना पास कोणी दिला? यावर सभागृहात चर्चा होणे गरजेचे आहे. याबाबतची मागणी विरोधकांनी केली होती. यावर सरकारकडून उत्तर अपेक्षित होते असे शरद पवार म्हणाले. पण सरकारने याबाबत काही उत्तर दिले नाही. याउलट याबाबत चर्चेची मागणी करणा-या खासदारांचे निलंबन केल्याचे शरद पवार म्हणाले. आजपर्यंत संसदेत असे कधी घडले नव्हते असेही शरद पवार म्हणाले.