पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगारात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. बलात्काराचा आरोप असलेला दत्तात्रय गाडे हा आरोपी फरार आहे. पोलिसांनी त्याच्या भावाकडे त्याची चौकशी सुरू केली आहे. दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुण्यातील शिरूर पोलिस स्थानकात या आधी चोरी आणि चेन स्नॅचिंग यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे.
पीडित तरुणीने या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. आरोपी दत्तात्रय गाडेला शोधण्यासाठी पोलिसांनी आठ पथकं तयार केली आहेत. या पथकांकडून दत्तात्रय गाडेचा कसून शोध घेतला जात आहे. दत्तात्रय गाडे हा पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरातील शेतात लपण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून शेतात श्वान पथकाच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या भावाला गाठले असून त्याच्याकडून माहिती घेतली जात आहे.
मंगळवारी (२५ फेब्रुवारी) पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली. स्वारगेट डेपोतील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये पीडित आणि आरोपी दोघेही स्पष्टपणे दिसत नाहीत. बस ज्या ठिकाणी उभी आहे, त्याठिकाणी अंधार आहे. आजूबाजूला अनेक बस असल्याचे देखील दिसत आहे. स्वारगेट बस आगाराच्या मधोमध ही बस उभी असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. या शिवशाही बसवर सोलापूर-स्वारगेट अशी पाटी लिहिलेली आहे. पोलिसांकडून सध्या या शिवशाही बसची तपासणी सुरू आहे. या बसमध्ये पोलिसांना काही पुरावे मिळतात का, हे बघावे लागेल. तसेच पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून कोणती माहिती समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अत्याचार झाल्यानंतर आरोपी बसमधून उतरून निघून गेला. त्यानंतर मुलगीही बसमधून खाली उतरली. ती दुस-या बसमध्ये बसून आपल्या गावी जात होती, तेव्हा तिने एका मित्राला फोन लावला आणि घडलेला प्रसंग सांगितला. मित्राने सांगितल्यावर ही तरुणी पोलिस ठाण्यात आली आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.