30.8 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeमहाराष्ट्रगुलाबी जॅकेटवाले बहिणींना विसरले

गुलाबी जॅकेटवाले बहिणींना विसरले

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका

मुंबई : ज्यांच्या मतांवर महायुती सरकार सत्तेत आले त्याच लाडक्या बहिणी, शेतकरी, वंचित, आदिवासी यांचा महायुतीने विश्वासघात केला. निवडणुकी आधी गुलाबी जॅकेट घालून फिरणारे आता गुलाबी जॅकेट ही विसरले आणि लाडक्या बहिणींना विसरले अशी टीका काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. पण या बजेट मध्ये लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली नाही, लाडक्या बहिणींचा उल्लेख ही भाषणात नाही. एकीकडे लाडकी बहिण योजनेत वेगवेगळे निकष लावून महिलांना अपात्र केले जात आहे. दुसरीकडे निधी वाढवून दिला नाही यावरून तिजोरीत खडखडाट असल्याचे स्पष्ट आहे असे विधी मंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले. या अर्थसंकल्पात शेतक-यांशी देखील सरकारने गद्दारी केली आहे. शेतक-यांना कर्जमाफी देणार असे आश्वासन महायुती सरकारने निवडणुकीत दिले होते पण आज अर्थसंकल्पाच्या भाषणात बळीराजाच्या पदरी निराशा आली आहे, त्यामुळे महायुती सरकार क्या हुआ तेरा वादा? बँका आता शेतक-यांना कर्ज देणार नाही याला कोण जबाबदार असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

कंत्राटदारांसाठी हे बजेट आहे का?
या अर्थसंकल्पात मुंबई, पुणे येथील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाना भरघोस निधी देण्यात आला, उरलेला निधी नागपूर येथील प्रकल्पाना देण्यात आला. पण ग्रामीण भागातील योजना, प्रकल्पाकडे दुर्लक्ष करण्यात आले. शहरी भागातील प्रकल्प म्हणजे कंत्राटदारांसाठी हे बजेट आहे का? दलित, वंचित, आदिवासी सर्वसामान्यांचा विसर या सरकारला पडल्याची टीका विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

घोषणांचा सुकाळ, निधीचा दुष्काळ
आज अर्थसंकल्प झाल्यावर महाविकास आघाडीने विधान भवनाच्या पाय-यांवर महायुती सरकार विरोधात आंदोलन केले. हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त घोषणांचा सुकाळ,निधीचा मात्र दुष्काळ आणि सरकारची जुमलेबाजी या अर्थसंकल्पातून दिसली, असा संताप विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR