मुंबई/पुणे : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या २,८६९ जागांसाठी आज मतदानाचा धुरळा उडाला असून एकूण १५,९०८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. उद्या(१६ जानेवारी) सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले.
राज्यभरातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या देखील घटना घडल्या. त्यामुळे ज्या ठिकाणी मतदानाला उशिरा सुरुवात झाली, त्या ठिकाणी मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली आहे. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदानाच्या प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतदारांच्या बोटावर लावली जाणारी शाई (इन्क) सहजासहजी पुसली जात असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला आहे. शाई जर पुसली जात असेल, तर पारदर्शक मतदानावर प्रश्नचिन्ह उभे राहते असे म्हणत त्यांनी यावर आक्षेप घेतला.
राज ठाकरेंच्या दाव्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ भूमिका स्पष्ट केली आहे. मतदानासाठी वापरली जाणारी शाई ही गुणवत्तापूर्ण असून ती सहजासहजी निघणारी नाही. नागरिकांनी शाईबाबत कोणताही संभ्रम मनात ठेवू नये किंवा अफवा पसरवू नयेत असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

