21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रऐन लग्नसराईत फुलांचे दर वाढले

ऐन लग्नसराईत फुलांचे दर वाढले

शेवंती, झेंडूची तिप्पट दराने विक्री

छत्रपती संभाजीनगर : एरवी हिवाळ्यात बहुतांश फुलांची फार मोठ्या प्रमाणात आवक असते; परंतु अलीकडे झालेल्या अवकाळी पावसामुळे बहुतांश फुलांची आवक कमालीची घटून दरात तिपटीपर्यंत भाववाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे ऐन लग्नसराईत मागणी खूप जास्त असताना, बहुतांश फुलांची आवक नेहमीच्या तुलनेत निम्यापेक्षाही कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, पाचशे-सहाशे रुपयांचे जोडीचे मोठे हार चक्क आठशे-हजार रुपयांपर्यंत पोहोचले असल्याचे फुलबाजारात दिसून येत आहे.

मागच्या महिन्यापासून लग्नसराई जोरात सुरू झाली आणि अगदी पुढच्या महिन्यापर्यंत लग्नसराईचा धुमधडाका सुरूच राहणार आहे. असे असताना याच लग्नसराईच्या काळात आवर्जून लागणारी फुले मात्र रुसली आहेत. अलीकडे झालेल्या अवकाळी पावसाचा फटका थेट फुलांच्या उत्पादनाला बसला असून, फुलांची आवक दैनंदिन हिवाळ्याच्या प्रमाणात केवळ १० ते २० टक्केच आहे, असेही विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मागच्या काही आठवड्यांत एकूण एक फुलांचे दर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

याच अवकाळी पावसाचा फटक्याचा परिणाम म्हणून काही आठवड्यांपूर्वी २० रुपये किलोने ठोक विक्री झालेल्या गलांड्याची आता १०० रुपये किलोने ठोक विक्री होत आहे, तर १४०-१५० रुपये किलोने किरकोळ विक्री होत आहे. काही आठवड्यांपूर्वी ५० रुपये किलोने ठोक विक्री झालेल्या शेवंतीची आता १५० रुपये किलोने ठोक विक्री होत असून, २०० रुपये किलोने किरकोळ विक्री होत आहे. काही आठवड्यांपूर्वी ५० रुपये किलोने ठोक विक्री झालेल्या गुलाबाची आता २०० रुपये किलोने ठोक तसेच किरकोळ विक्री होत आहे. ३० ते ५० रुपये किलोने ठोक विक्री झालेल्या झेंडूंची आता १०० रुपये किलोने ठोक विक्री व १५० रुपये किलोने किरकोळ विक्री होत आहे.

हार झाले दीडपटीने महाग
फुलांची किंमत दुपटी-तिपटीने वाढल्याने हारांची किंमतही किमान दीड पट तसेच दुप्पट झाली आहे. लग्नसराईत वधू-वरांसाठी वापरण्यात येणा-या मोठ्या जोडीच्या हारांची सध्या ८०० ते १००० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. याच हाराची विक्री काही आठवड्यांपूर्वी ५०० ते ६०० रुपयांपर्यंत होत होती, अशी माहिती विक्रेते शेख इरफान यांनी दिली. खरे म्हणजे हिवाळ्यातील पूरक हवामानामुळे फुलांची आवक खूप चांगली असते; परंतु अवकाळी पावसाने उत्पादनाला जबर फटका बसला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR