मुंबई : नुकताच देशातील ३ दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून दिली होती. यावरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मते हवीत म्हणून हवे त्यांना भारतरत्न देत आहेत, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे . मुंबईत सुरू असलेल्या ठाकरे गटाच्या स्थानीय लोकाधिकार समिती अधिवेशनातून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राज्यातील गोळीबार प्रकरणावरून राज्य सरकारवर देखील निशाणा साधला आहे.
भारतरत्न पुरस्कारावरून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मोदींना हवे त्यांना भारतरत्न देत आहेत, ज्यांचा जिवंत असताना विरोध तुम्ही केला, जसे की करपुरी ठाकूर, त्यांना जनसंघाने विरोध केला होता, तेव्हा तुम्ही देखील त्यांना विरोध केला, आता बिहारध्ये मते हवीत म्हणून त्यांना भारतरत्न देत आहात, तसेच आम्ही तेव्हा मागणी केली होती एम. एस. स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करावे, जर भारतरत्न देत आहात तर त्यांनी दिलेला अहवाल देखील लागू करावा, हा पोकळपणा आहे, येत्या काळात आणखीन काही भारतरत्न जाहीर करतील, भाजपला वाटत आहे की, एक अख्खा प्रदेश आपल्या बाजूने येईल, पण आता असे राहिले नाही.
आजकाल फोन येतो, मोदी सरकारला मत देणार का?
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, भाजपकडे करोडो रुपये आहेत, १३०० कोटी भाजपला मिळाले आहेत, भाडोत्री लोक खूप आहेत, भाडे मिळाले की काहीही मिळते, आजकाल फोन येतो, मोदी सरकारला मत देणार का? पण मोदी सरकार जो खर्च करत आहेत तो पैसा भारत सरकारचा नाही का? एका शेतक-याने सांगितले आहे, की मी कुटुंबासह आत्महत्या करेन पण मोदींना मत देणार नाही.