27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसोलापूरबोहाळी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

बोहाळी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

पंढरपूर : कडक उन्हाळयामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. बोहाळी (ता. पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने मागणी केल्याप्रमाणे प्रशासनाकडून पिण्यासाठी पाणी सोडण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार बोहाळी येथील राणाबाई ओढ्याला पाणी सोडून बंधारे भरुन घेण्यात येत आहेत. मात्र, पाण्याचा प्रवाह (गेज) कमी असल्यामुळे बंधारे भरण्यास वेळ लागत आहे. पाण्याचा गेज वाढून त्वरित बंधारे भरून द्यावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार नीरा उजवा परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींना पाणी मिळण्यासाठी ओढ्याला पाणी सोडून बंधारे भरून घेण्यात यावेत व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या आहेत.यासाठी प्रशासनाने पथक नियुक्त केले आहे. या पथकाव्दारे पाहणी करून, देखरेख करून केवळ बंधारे भरून घेण्यात येणार आहेत. निरा उजवा कालव्यातून उंबरगाव हद्दीतून बोहाळी येथील राणाबाई ओढ्याला पाणी सोडण्यात आलेले आहे. हे पाणी १० ते १२ गेजने येत आहे. यातही अनेक शेतकरी सायफन लाऊन पाणी चोरी करत आहेत. त्यामुळे बंधारे भरण्यास वेळ लागत आहे. बंधारे त्वरित भरावेत आणि गावाचा पाणीप्रश्न तत्काळ मार्गी लागावा म्हणून ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी पवार, उपसरपंच जगनाथ जाधव व सदस्य प्रयत्नशील आहेत.

बंधाऱ्यात येणारे पाणी कमी गेजने येत आहे. त्यामुळे बंधारे भरण्यास वेळ लागत आहे. जादा गेजने पाणी सोडून राहिलेले बंधारे भरुन घेण्यात यावेत. बंधारे भरले तरच पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा होऊ शकेल.आतापर्यंत १२ पैकी आठ बंधारे भरले गेले आहेत. उर्वरित चार बंधारे भरून घेण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आलेली आहे. याकरिता नीरा उजवा कालव्यातून जादा गेजने पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR