बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळेला वॉण्टेड घोषित केले आहे. इतकेच नाही तर त्याला शोधणा-या व्यक्तीला बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा देखील पोलिसांकडून करण्यात आली आहे. आता फरार कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आली होती. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे या आरोपींनी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या केली होती. या हत्येचा तपास नि:पक्षपातीपणे होण्यासाठी बीड जिल्ह्यातील नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सुरुवातीला एसआयटीची स्थापना करण्यात आली. यानंतर सीआयडी आणि न्यायालयीन चौकशीच्या माध्यमातून या हत्येचा तपास वेगाने सुरू आहे.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, महेश केदार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मोक्काही लावण्यात आला. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावरही मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र अद्यापही या हत्येप्रकरणी कृष्णा आंधळे हा फरार आहे.
संतोष देशमुख यांची हत्या होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्यापही कृष्णा आंधळे हा सापडत नसल्याने पोलिसांनी त्याला वॉण्टेड घोषित करत बक्षिसाची घोषणा केली आहे. यानंतर आता सीआयडी अधिका-यांनी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्यासाठी बीड न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.