मुंबई : प्रतिनिधी
टेलिव्हिजनच्या इतिहासात रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेत प्रभू श्रीराम आणि माता सीतेची भूमिका साकारणा-या अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या ऐतिहासिक जोडीबाबत आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तब्बल ३९ वर्षांनंतर ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे.
१९८७ मध्ये आलेल्या ‘रामायण’ मालिकेनंतर अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनी २०२४ मध्ये एका म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले होते. मात्र, तब्बल चार दशकांनंतर ते थेट फीचर फिल्ममध्ये एकत्र येत आहेत. प्रदीप गुप्ता दिग्दर्शित ‘नोटिस’मध्ये हे दोघे एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज न होता ६ नोव्हेंबर रोजी ‘वेव्हस््’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रीमियर होईल. त्यानंतर तो ३६ सॅटेलाईट टेलिव्हिजन चॅनलवर प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
ही कथा एका १५० वर्षे जुन्या दुकानाभोवती फिरते, ज्याला विकासकामामुळे धोका निर्माण झाला आहे. अरुण गोविल यांनी एका सामान्य माणसाची भूमिका साकारली आहे, जो आपले ऐतिहासिक दुकान वाचवण्यासाठी भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढा देतो. तर दीपिका चिखलिया यांनी त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली असून, या खडतर संघर्षात त्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात.
दरम्यान, अरुण गोविल सध्या रणबीर कपूर आणि यश यांच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण : राईज ऑफ अ लेजेंड’ या मेगाबजेट चित्रपटामुळेही चर्चेत आहेत. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात ते प्रभू श्रीरामाचे वडील म्हणजेच ‘राजा दशरथ’ यांची भूमिका साकारत आहेत. ‘रामायण’ चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन ५ नोव्हेंबर रोजी होणार असून, भारतात हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होण्याची दाट शक्यता आहे.
















