28.6 C
Latur
Saturday, March 15, 2025
HomeUncategorizedउन्हाची तीव्रता वाढल्याने बाष्पिभवनाचा वेग वाढला

उन्हाची तीव्रता वाढल्याने बाष्पिभवनाचा वेग वाढला

अक्कलकोट-उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असताना कुरनूर धरणात मात्र केवळ ४६ टक्के नाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने बाष्पिभवनाचा वेगही वाढला आहे. यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच उन्हाचे चटके बसत असल्याने ऐन एप्रिल आणि मेचा उन्हाळा गंभीर राहील, असे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर दुसरे आवर्तन साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल, अशी शक्यता पाटबंधारे विभागाकडून वर्तविली जात आहे.

साधारणतः फेब्रुवारी महिना थंडीचा मानला जातो. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्यातच पारा ३८ अंश चार केल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. याचा परिणाम जलस्रोतांवर होत आहे. मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात पारा ४० अंशाच्या उंबरठ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर जलसाठ्यातील पाण्याच्या बाष्पिभवनाचा वेग झपाट्याने वाढला आहे. दुसरीकडे एप्रिलमधील आवर्तनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत पुन्हा उजनी धरणातील पाणी कुरनूरमध्ये सोडण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप उजनीच्या पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. दोन आवर्तनामध्ये जितके पाणी बोरी नदीमध्ये सोडले गेले तितके पाणी पुन्हा धरणामध्ये येईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. आता पाटबंधारे विभाग याचे नियोजन कसे करेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. यासंदर्भात योग्य त्या सूचना आमदार कल्याणशेट्टी यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. कुरनूर धरणामध्ये सध्या ४६ टक्के म्हणजेच ३५७.७४ दशलक्ष इतका घनफूट साठा आहे. तालुक्याच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पहिले आवर्तन सोडले गेले. बोरी नदीवर आठ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यांमध्ये अजूनही एक ते दीड मीटर पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाऊ शकते, असे जाणकार सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना गरज पडली तर पहिल्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या मध्यामध्ये पाणी सोडले जाऊ शकते.

टंचाईची तीव्रता बघून हा निर्णय होणार आहे. त्याबाबतचा निर्णय आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि पाटबंधारे विभाग घेणार आहेत. दुसरे आवर्तन सोडताना सांगवी जलाशयाचा विचार करावा लागणार आहे. कारण हा बंधारा खूप जुना आहे. त्याचे गेट उघडत नाहीत. ते जर गेट खुले झाले तरच पाणी मोठ्या प्रमाणात खालच्या बंधाऱ्यांना मिळू शकते. नसेल तर याच बंधाऱ्यांमध्ये मोठा पाणीसाठा होऊ शकतो. या जलाशयातून काही दिवसांपूर्वी गाळ काढल्यामुळे त्याठिकाणचा जलसाठा वाढला आहे. त्यामुळे अन्य बंधाऱ्यापर्यंत हे पाणी पोहोचू शकत नाही. ज्यावेळी पहिले आवर्तन झाले. त्यावेळी २७ टक्के सोडण्यात आले. आता उर्वरित ४६ टक्के पाणी जे आहे ते वाष्पिभवनाद्वारे एक ते दीड सेंटीमीटरने कमी होत आहे.

पाटबंधारे विभागाच्या मते, जे पाणी रोज बाष्पिभवनाने कमी होत आहे तितके पाणी उजनी धरणातून कुरनूर धरणात येईल पण याचे रोटेशन अजून निश्चित झालेले नाही. जेव्हा हे पाणी धरणात येईल त्यावेळी नक्कीच पाणीसाठा वाढणार आहे.दरवर्षी कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली जाते. या बैठकीमध्ये पाण्याचे नियोजन होते. यावर्षी देखील ही बैठक घेतली गेली. त्यानुसारच पाणी सोडले जावे, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. मुख्य म्हणजे प्रशासनाने गळती थांबविण्याकडे अधिक लक्ष द्यावे. पाणी कुठेही वाया जाऊ देऊ नये. झालेल्या नियोजनाची योग्य पध्दतीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.असे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR