नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या निलंबनाबाबतीचा आचार समितीचा अहवाल मंगळवारी लोकसभेत मांडला जाणार आहे. महुआ मोईत्रा यांच्या मुद्द्यावरून सोमवारी लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. या मुद्द्यावर सोमवारी चर्चेची मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली. ‘लाच घेऊन प्रश्न विचारल्या’ प्रकरणी महुआ मोईत्रा यांची सभागृहातून निलंबन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अजेंड्यानुसार, आचार समितीचे अध्यक्ष विनोद कुमार सोनकर समितीचा अहवाल सभागृहात मांडणार आहेत. एथिक्स कमिटीच्या सदस्या अपराजिता सारंगी यांनी माध्यमांना सांगितले की, अध्यक्षांनी आम्हाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही अहवाल मांडू. आम्ही सर्व काही ऐकले असून सर्वांना बोलण्याची संधी दिली गेली, असे त्या म्हणाल्या.