38 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeलातूरजळकोटमधील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

जळकोटमधील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणूक; मताधिक्याकडे लक्ष

जळकोट : प्रतिनिधी
लातूर लोकसभेसाठी दिनांक ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोन पक्षांमध्ये सरळ लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. दि. १८ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला तर दिनांक १९ एप्रिल रोजी महाविकास आघाडीकडून डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.

जळकोट तालुका हा लातूर जिल्ह्यातील शेवटचा तालुका आहे. या तालुक्यामध्ये जवळपास लाखाच्या जवळ मतदान आहे. यामुळे या तालुक्याकडे वरिष्ठ नेत्यांचे विशिष्ट लक्ष असते. जळकोट तालुक्यात देखील लातूर लोकसभेसाठी स्थानिक पातळीवरील नेत्यांकडून प्रचार केला जात आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे डॉ. शिवाजीराव काळगे व भाजपाचे सुधाकर शृंगारे यांनी जळकोट तालुक्यात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.

जळकोट तालुक्यात कोणत्या पक्षाला अधिक मताधिक्य मिळेल याकडेदेखील लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जळकोट तालुक्यातील विविध पक्षांच्या अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. जळकोट तालुक्यामध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून मन्मथप्पा किडे यांची ओळख आहे. जळकोट तालुक्यात बराच मतदार यांना मानणारा आहे. या निवडणुकीत आप्पांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्यासाठी कंबर कसली आहे. जळकोट शहरामध्ये देखील यावेळी काँग्रेसला लीड घेण्यासाठी आप्पा हे प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे घोणसी सर्कलमध्ये नवनियुक्त महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती शीलाताई पाटील यांचे गाव गव्हाण आहे.

या जिल्हा परिषद सर्कलमधून त्या जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या. आता त्यांच्यावरदेखील घोणसी सर्कलमधून मताधिक्य मिळवण्याची जबाबदारी आलेली आहे. यासोबतच जळकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा विकास सहकारी साखर कारखान्याचे संचालक, तिरुका गावचे उपसरपंच मारुती पांडे यांच्यावरदेखील लोकसभा निवडणुकीत गावातून काँग्रेस पक्षाला लीड देण्यासोबत तालुक्यातून अधिकचे मतदान घेऊन देण्याची जबाबदारी आहे. काँग्रेसचे बाजार समितीचे माजी संचालक बाबूराव जाधव, बाजार समितीचे उपसभापती माजी जिल्हा परिषद गटनेते संतोष तिडके, बाजार समितीचे विद्यमान संचालक दत्ताभाऊ पवार, पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी ताकबिडे, काँग्रेसचे जळकोट शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, ठाकरे गट शिवसेना शहरप्रमुख नितीन धुळशेट्टे, शिवसेना तालुकाप्रमुख ठाकरे गट मुक्तेश्वर येवरे, माजी सभापती व्यंकटराव केंद्रे, माजी सरपंच मेहताब बेग, अल्पसंख्याक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नूर पठाण, मागासवर्गीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्राम कांबळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष नेमीचंद पाटील, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष धनराज पाटील हेदेखील त्या-त्या भागात काँग्रेसच्या उमेदवारास मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
यासोबतच महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना जळकोट शहरामधून मताधिक्य मिळवून देण्यासाठी माजी नगराध्यक्ष किशनराव धुळशेट्टे, नगराध्यक्ष व्यंकटराव तेलंग, भाजपाचे ज्येष्ठ नेते सोमेश्वर सोपा, भाजपाचे शहराध्यक्ष शिवानंद देशमुख प्रयत्न करत आहेत तर तालुक्यातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक धर्मपाल देवशेट्टे, भारतीय, आरपीआयचे तालुकाध्यक्ष विनोद कांबळे, शिवसेना तालुकाप्रमुख शिंदे गट उमाकांत इंमडे, अविनाश नळंदवार, माजी पंचायत समिती सदस्य अरविंद नागरगोजे, माजी जि. प. सदस्य चंदन पाटील नागरगोजे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सत्यवान पांडे, भाजपाचीही दिग्गज मंडळी, भाजपाला मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
निमित्त लोकसभा निवडणुकीचे असले तरी आपापल्या भागातून अधिकचे मतदान मिळवून देण्यासाठी दिग्गज नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. या लोकसभा निवडणुकीत जळकोट तालुक्यातील महाविकास आघाडी व महायुतीमधील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR