30.8 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeसोलापूरदक्षिण सोलापुरात निकराचा सामना

दक्षिण सोलापुरात निकराचा सामना

सोलापूर : रणजीत जोशी

दक्षिण सोलापूर मतदारसंघात प्रणिती शिंदे, भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी प्रचाराचा धडाका सुरू ठेवला आहे. गेल्या दोन विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसप्रेमी मतदार घटून भाजपप्रेमी मतदारांची संख्या वाढली. मात्र, यावेळी तसे चित्र मतदारसंघात दिसून येत नाही.

भाजप दक्षिणमध्ये प्रचाराचा जोर वाढवून या निवडणुकीतील ३८ हजार ५७८ मतांची आघाडी कायम राखणार का? अथवा काँग्रेस बाजी मारणार का? याची उत्सुकता आहे. २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत दिलीप माने यांना ७२ हजार ६८ तर शिवसेनेचे रतिकांत पाटील यांना ५४ हजार ४०६ मते मिळाली होती. काँग्रेसचे माने १७ हजार ९८२ मतांनी विजयी झाले होते. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत माने यांना ४२ हजार ९५४ तर भाजपचे सुभाष देशमुख यांना ७० हजार मते मिळाली. २७ हजार १२३ मतांनी देशमुख विजयी झाले होते. येथे अधिक उमेदवार रिंगणातअसल्याचा फटका माने यांना बसला होता.

२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपचे सुभाष देशमुख यांना ८६ हजार ८४२ मते मिळाली तर काँग्रेसचे बाबा मिस्त्री यांना ५७ हजार ६६८ मते मिळाली. भाजपचे सुभाष देशमुख २९ हजार १७४ मतांनी विजयी झाले होते.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना ५४ हजार ९७४ तर अ‍ॅड. शरद बनसोडे यांना ४९ हजार ८९३ मते मिळाली होती. शिंदे यांना ८ हजार ८१ मतांची आघाडी मिळाली. २०१४ मध्ये शिंदे यांना ५३ हजार ८७५ तर बनसोडे यांना ८१ हजार ६९२ मते मिळाली. यावेळी बनसोडे यांना दक्षिणमध्ये २७ हजार ८२१ मतांची आघाडी मिळाली होती. २००९च्या तुलनेत शिंदे यांना १ हजार १०३ मते कमी मिळाली होती. २०१९मध्ये भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांना ८८ हजार ६९१ मते मिळाली होती, शिंदे यांना ५० हजार ११३ मते मिळाली होती तर वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना २८ हजार ९२ मते मिळाली होती. भाजपने ३८ हजार ५७८ मतांनी बाजी मारली.

यंदा मतदारसंघाचे चित्र वेगळे आहे. सहकार क्षेत्रात दीपस्तंभ असलेल्या श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी भाजपने पाडून शेतकरी सभासद, कामगार कारखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांचे नुकसान केले. कारखान्यावरील या अन्यायाचा बदला सभासदांनी काँग्रेसला मतदान करून घ्यावा, असे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केल्यामुळे दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, सोलापूर शहर, मोहोळ आणि तुळजापूर तालुक्यातील कारखान्याचे शेतकरी सभासद व हितचिंतक भाजपच्या विरोधात मतदान करतील असे चित्र आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघात लिंगायत, धनगर, मुस्लिम, मराठा आदी समाजांची लोकसंख्या असून लिंगायत व धनगर समाजाची मते निर्णायक ठरतील.

शहरालगत मतदारसंघ असून बेरोजगारी, शेतीसाठी पाण्याची टंचाई, रस्ते आदी प्रश्न मतदारसंघात आहेत. नवीन पिढी रोजगारासाठी स्थलांतरित होत असून उद्योग येत नसल्याने युवकांमध्ये नैराश्य आहे. वडापूर बॅरेज बंधारा, मंद्रुप एमआयडीसी आदी मुद्यांवरून मोठ्या प्रमाणात राजकारण केले गेले. माजी आमदार दिलीप माने यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाल्याचा फायदा प्रणिती शिंदे यांना मिळू शकतो तर आमदार सुभाष देशमुख यांची तालुक्यावर असलेली पकड, लोकमंगल परिवाराची यंत्रणा याचा फायदा राम सातपुते यांना मिळू शकतो.दक्षिण सोलापूर मतदारसंघात सुरेश हसापुरे यांच्या यंत्रणेचा फायदा प्रणिती शिंदे यांना होणार असून सोसायट्यांच्या माध्यमातून हसापुरे यांचा गावोगावी संपर्क आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी हुरडा पार्ट्यांच्या माध्यमातून दक्षिण सोलापुरात संपर्क वाढवला असून शिंदे यांनी दक्षिण सोलापूरचे प्रतिनिधित्व केले असल्याने त्यांना मतदारसंघाचा दांडगा अभ्यास आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी मतदारसंघात स्वत:च्या संपर्कसूत्रांच्या माध्यमातून दक्षिणमध्ये प्रचाराचे जाळे विणले आहे. दक्षिण सोलापुरात मतांच्या आघाडीसाठी निकराचा सामना होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR