23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) ऑनलाईन आरक्षण प्रणाली यंदा एक जानेवारीपासून सुरू झाली आहे. प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत असून १ जानेवारी ते २० मे पर्यंत १२ लाख ९२ हजार तिकिटांचे आरक्षण झाले आहे. गेल्यावर्षी याच काळात नऊ लाख ७५ हजार तिकिटांचे आरक्षण झाले होते. गेल्यावर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे तीन लाखांनी जास्त आहे.

प्रवाशांना घरबसल्या तिकीट उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने एस. टी. ने अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातूनदेखील प्रवाशांना तिकीट काढता येते. ही दोन्ही माध्यमे एक जानेवारीपासून अद्ययावत करण्यात आली. जुन्या प्रणालीतील अनेक त्रुटी काढून टाकल्याने ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत सोपी व सुलभ झाली आहे.

या अद्ययावतीकरणामुळे प्रवाशांकडून दररोज दहा हजार तिकिटे आरक्षित केली जात असल्याची आकडेवारीही समोर आली आहे. या दोन्ही प्रणालीद्वारे प्रवाशांना अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतींचेदेखील आगाऊ आरक्षण मिळू शकते, असे महामंडळाने सांगितले. एस.टी. महामंडळाकडून सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन व मोबाईलच्या अ‍ॅपद्वारे तिकीट काढता येत असल्याने आता प्रवाशांना एस.टी. ची वाट न बघता व स्टँडवर जाऊन तिकीट न काढता घरात बसूनच तिकीट काढून बेळेत जाता येते, त्यामुळे प्रवाशांची दगदग आणि वेळेची बचत होत आहे.

ऑनलाईन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास ७७३८०८७१०३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. हा हेल्पलाईन क्रमांक प्रवाशांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी २४ तास सुरू असणार आहे. ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरूनही तिकिटे आरक्षित न होण्याच्या (पेमेंट गेटवेसंदर्भात) तक्रारीसाठी ०१२०० ४४५६४५६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एस. टी. महामंडळाने केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR