22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरगणपतीपुळे समुद्रात पंढरपूरच्या युवकाचा मृत्यू; तिघांना वाचविण्यात यश

गणपतीपुळे समुद्रात पंढरपूरच्या युवकाचा मृत्यू; तिघांना वाचविण्यात यश

पंढरपूर : सोलापूर व पंढरपूर येथील चार मित्र दुचाकीवर समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद लुटायला गेले असता अजित वाडेकर चौघे अंघोळ करताना खोल समुद्रात बुडाल्याची घटना गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे घडली. या दुर्घटनेत अजित धनाजी वाडेकर (२५, रा. इसबावे परिचारक नगर, पंढरपूर, जि. सोलापूर) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मात्र, अन्य तिघांना वाचविण्यात यश आले.

अजय बबन शिंदे (२३), आकाश प्रकाश पाटील (२५) आणि समर्थ दत्तात्रय माने (२४, सर्व रा. सोलापूर) अशी दुर्घटनेतून वाचलेल्या तिघांची नावे आहेत. अजित वाडेकर आणि त्यांचे मित्र रविवारी सकाळी १० वाजता दुचाकींवरून पंढरपूर येथून गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनासाठी आले होते. देवदर्शन न करता आधी समुद्रात अंघोळ करण्याचा निर्णय चौघांनी घेतला. अंघोळ करताना खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळी अजित वाडेकर खोल पाण्यात अडकले. त्यांना बाहेर येता येत नसल्याचे लक्षात येताच मित्रांनी व इतर पर्यटकांनी आरडाओरड केली.

ही गोष्ट जीवरक्षक आणि गस्तीसाठी असलेले गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक संदीप साळवी व हेडकॉन्स्टेबल कुणाल चव्हाण यांच्या निदर्शनाला येताच त्यांनी जीवरक्षकांना बोलावून समुद्राच्या पाण्यात पाठवले. जीवरक्षक अक्षय माने, महेश देवरुखकर, अजिंक्य रामाणी, विशाल निंबरे यांच्यासह व्यावसायिक राकेश शिवलकर यांनी समुद्राच्या पाण्यात उड्या घेऊन तिघांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर पाण्यात अडकलेल्या अजित वाडेकर यांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढून देवस्थानच्या रुग्णवाहिकेने मालगुंड प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव यांनी तपासून अजित वाडेकर यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. उर्वरित तिघांची प्रकृती सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी जयगड पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.अजित वाडेकर हा मागील दोन वर्षापूर्वी पंढरपूर येथे मामाच्या गावाला राहायला आला होता. त्याचे मामाच्या मुलीसोबत वर्षभरापूर्वीच लग्न झाले. तो दुचाकी वाहने दुरुस्ती करण्यात पटाईत मिस्त्री होता. यामुळे त्याला दुचाकीवर फिरण्याची आवड होती.समुद्रात पोहताना अजित वाडेकर याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याबाबतची माहिती त्यांच्या घरच्यांना रविवारी संध्याकाळपर्यंत माहीत नव्हती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR