मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला १९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. मात्र, अजूनपर्यंत महायुतीमधील आठ जागांवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे एकमत झाले नाही. मुंबईतील दक्षिण मुंबईसह तीन जागा आणि ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर अशा ८ जागांवर अजूनही महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे. यामुळे या मतदारसंघात उमेदवार ठरले नाहीत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने राज्यातील सर्व ४८ जागांवरील वाद मिटवला असून, प्रचाराला सुरुवात केली आहे.
दरम्यान, आठ जागांवर उमेदवारांची घोषणा होईल तेव्हा होईल, मात्र प्रचारात आघाडी घेता यावी, यासाठी महायुतीने संयुक्त प्रचाराची रणनीती आखली आहे. परंतु उमेदवार जाहीर न झाल्याने प्रचारावर आघाडी कशी घ्यावी असा प्रश्न या आठ मतदारसंघांतील महायुतीमधील तिन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पडला आहे. भाजप आणि शिवसेनेच्या राज्यातील पक्षनेतृत्वाने त्यावर तोडगा काढताना आपापल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांना मतदारसंघात प्रचार करण्याचे आदेश दिले आहेत.
तर दुसरीकडे नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी मुंबईत जाऊन नाशिकच्या जागेबाबत चर्चा केली आहे. तरीदेखील नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर झाला नाही. दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ देखील गेल्या तीन दिवसांपासून नाशिकमध्ये ठाण मांडून बसले आहेत. सूत्रांच्या मते, आणखी दोन दिवस तरी नाशिकच्या जागेवर निर्णय होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महायुतीमधील कार्यकर्ते संभ्रमात आहेत, तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत.