मुंबई : प्रतिनिधी
छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय कॉमेडी मालिका ‘भाभीजी घर पर हैं २.०’चा काही महिन्यांपूर्वीच प्रीमिअर झाला होता. यामध्ये अंगुरी भाभीच्या भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदेची घरवापसी झाली होती. परंतु आता शिल्पाच्या कमबॅकनंतर अवघ्या दोन महिन्यांतच ही मालिका बंद होणार असल्याचे कळत आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार, ‘भाभीजी घर पर हैं २.०’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून ‘अँड टीव्ही’मध्ये होणा-या मोठ्या बदलांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
मे २०२६ पासून अँड टीव्ही एक पेड री-रन चॅनल बनण्याची शक्यता आहे. नवीन व्यवस्थापनाकडून पदभार स्वीकारल्यानंतर हा बदल लागू होईल. या चॅनलच्या धोरणात बदल करण्याची योजना आखली जात आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत चॅनल नवीन कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करणे थांबवणार आहे आणि फक्त जुने शोज प्रसारित करणार आहे. याचा थेट परिणाम चॅनलवरील सध्याच्या शोज आणि मालिकांवर होणार आहे.
चॅनलच्या सर्वांत लोकप्रिय आणि सर्वाधिक काळ चाललेल्या मालिकांपैकी एक ‘भाभीजी घर पर हैं’ ही मालिका आहे. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग असून त्या सर्वांची आता निराशा होणार आहे. या मालिकेच्या कलाकारांना ५ एप्रिल रोजी शेवटच्या एपिसोडचे शूटिंग करण्यास सांगितले आहे.
मालिकेचा शेवटचा भाग १६ एप्रिल २०२६ रोजी प्रसारित होण्याची शक्यता आहे. या मालिकेत अंगुरी भाभीच्या रूपात तब्बल दहा वर्षांनंतर अभिनेत्री शिल्पा शिंदेने कमबॅक केले होते. यात आधी शिल्पाच अंगुरी भाभीची भूमिका साकारत होती. परंतु निर्मात्यांशी काही वाद झाल्यानंतर तिने अचानक ही मालिका सोडली होती. त्यानंतर अभिनेत्री शुभांगी अत्रेने तिची जागा घेतली होती.

