25.5 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात थंडीचा कडाका वाढणार

राज्यात थंडीचा कडाका वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात यंदा मान्सून चांगला बरसलाच नाही. राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला गेला. यामुळे यंदा थंडी कमी असणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान विभागानेही थंडीवर अल निनोचा परिणाम जाणवणार असल्याचे म्हटले होते. आता पुढील काही दिवस थंडीचा कडाका राज्यातील अनेक भागांत जाणवणार आहे.

उत्तर भारतात थंडी सुरू झाली आहे. त्या भागांत बर्फवृष्टी पडत आहे. यामुळे उत्तरेकडून थंड वारे वाहू लागले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात होत आहे. थंडी आणण्यासाठी कमी दाबक्षेत्रेही सध्या मध्य प्रदेशसह महाराष्ट्रात अस्तित्वात येत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

येत्या काही दिवसांत पारा खाली जाणार
मध्य प्रदेशाबरोबर जोरदार थंड वारे महाराष्ट्राच्या भू- भागावर ओढले जाण्याच्या शक्यतेमुळे कडाक्याच्या थंडीचा प्रभाव जाणवणार आहे. डिसेंबरच्या महिन्यात पारा अधिक खाली येईल. महाराष्ट्रातील किमान तापमान सरासरी किंवा त्याखालची पातळी गाठेल आणि थंडीत वाढ होईल. विदर्भातील ११ तर खान्देशातील ३ जिल्ह्यांसह नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी या २२ जिल्ह्यांत थंडी जाणवणार आहे. दिवसाच्या थंडीबरोबर रात्रीच्याही थंडीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आता स्वेटर आणि जॅकेट खरेदीसाठी गर्दी होणार आहे. मुंबईत सकाळी गार वारे वाहत आहेत.

राज्यात गोंदियात सर्वांत कमी तापमान
राज्यात विदर्भातील तापमानात घसरण होत आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वांत कमी १२.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. पुणे शहराचे तापमान १४.५ अंश सेल्सियसवर होते. परंतु येत्या आठवड्यात पुणे शहराचे तापमान दहा अंशाच्या खाली जाणार आहे. सोमवारी नाशिक १४.२ तर नागपूरचे तापमान १२.८ अंश सेल्सियस नोंदवले गेले. यामुळे सध्या उत्तर महाराष्ट्रापेक्षा विदर्भात थंडी जास्त असल्याचे दिसून येत आहे. पुढील आठवडा राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR