पुणे : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या पत्नी मोहिनी यांच्यासह आरोपी अक्षय जवळकर यांना अटक करण्यात आली असून त्यांची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
या चौकशीत काही अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये वाघ यांचे अपहरण केल्यानंतर चालत्या कारमध्ये त्यांच्या त्यांच्या गळ्यावर तब्बल ७२ वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. शिवाय वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिनेच संपत्तीच्या आणि अनैतिक संबंधांच्या संशयातून हत्येचा कट रचल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तर सतीश वाघ यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटामध्ये फेकून देण्यात आला होता. तर ज्या धारदार शस्त्राने सतीश वाघ यांचा खून करण्यात आला होता. ते शस्त्र भीमा नदीत फेकून दिल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे. त्याचा तपास करण्यात आला मात्र, ते धारदार शस्त्र अद्याप पोलिसांना सापडलेले नसल्याची माहिती आहे.
सतीश वाघ हत्येप्रकरणी पत्नी मोहिनी वाघसह ६ आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. मोहिनी वाघ व अतिश जाधव यांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पवन श्यामसुंदर शर्मा, नवनाथ अर्जुन गुरसाळे, विकास सीताराम शिंदे, अक्षय हरिश जावळकर, मोहिनी सतीश वाघ आणि अतिश संतोष जाधव अशी न्यायालयीन कोठडी झालेल्या आरोपींची नावे आहेत.