मुंबई/छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाने धूमशान घातले असून, वादळी वा-यासह अनेक ठिकाणी आज पाऊस झाल्याने उन्हाळी पिकांसह आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच लातूर शहर परिसरासह औसा तालुक्यात विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. त्यात वीज पडून औसा तालुक्यात एका शेतक-याचा मृत्यू झाला. एकीकडे उन्हाच्या तीव्रतेने नागरिक त्रस्त होत आहेत. मात्र, दुपारनंतर वातावरणात बदल होऊन ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वा-यात अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे.
मराठवाड्यात छ. संभाजीनगर, लातूरसह ब-याच भागात आजही अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच राज्यात पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आदी जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातील तावशी ताड येथे वीज पडून एका शेतक-याचा मृत्यू झाला. तसेच लातूर शहर परिसरातही दुपारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच उन्हाळी पिके, फळबागांचेही नुकसान झाले.
सातारा जिल्ह्यात कोयना, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, शिरवळ परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात वादळी वा-यासह आवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. कोकणात रायगडमधील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात गारांचा पाऊस कोसळला. खामगाव, शेगाव परिसरातही वादळी वा-यासह पाऊस झाला. महाड,माणगाव, पोलादपूर, म्हसळा श्रीवर्धन भागात अवकाळी पाऊस झाला. तसेच कर्जत खोपोली, खालापूर तालुक्यांतदेखील अवकाळी पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे या परिसरातील वीट भट्टी व्यवसायिक संकटात सापडले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्येही चक्रीवादळ आणि झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. खेड भरणे मार्गावर पंचायत समितीसमोर महाकाय वृक्ष रस्त्यावर कोसळला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली.
छ. संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळीने मोठे नुकसान
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात वादळी वा-यासह पाऊस झाला. वा-याचा जोर जास्त असल्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उन्हाळी मका, बाजरी, ज्वारीचे मोठे नुकसान झाले.