सोलापूर : एसटी चालकाला अचानक फीट आल्याने नियंत्रण गमावल्याने बस रस्त्यावर उलटल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या बसमधून ३५ ते ४० प्रवाशी प्रवास करत होते. एसटी बस उलटल्यानंतर चालकाला एसटीतून बाहेर काढून त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले.
टेंभुर्णी-कुर्डूवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ हा प्रकार घडला. एसटी चालकाला फिट येऊन त्याचा तोल गेल्यामुळे एसटीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही बस टेंभुर्णीवरून कुर्डूवाडीला जात असताना हा अपघात झाला. या बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे.
एसटी उलटल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढून बाजुच्या शेतात बसवण्यात आले. यामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना कुर्डूवाडी शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे.