पुणे : बीड जिल्ह्यात अलीकडच्या काळात वाढती गुन्हेगारी पाहता यामध्ये खून, खंडणी, अपहरण आणि धमक्या यांसारख्या घटनांमुळे महाराष्ट्रभर बीड जिल्हा चर्चेचा विषय ठरत आहे. यामुळे जिल्ह्याची प्रतिमा वाईट होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात मराठा क्रांती मोर्चापुणे जिल्ह्याच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
पत्रकार परिषदेदरम्यान मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या, परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत झालेला मृत्यू आणि पुण्यातील राजगुरूनगर येथे दोन चिमुकल्यांचा झालेला खून अशा घटना चिंताजनक असून यावर सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कोंढरे, रेखा कोंडे, राजेंद्र कुंजीर, धनंजय जाधव, संतोष आतकरे उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय स्वार्थ आणि शक्तीचा गैरवापर कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला. यामध्ये काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या असून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. साक्षीदारांना पोलिस संरक्षण मिळावे आणि तपासासाठी एसआयटी नेमणूक करण्यात यावी, तपास प्रक्रिया स्वतंत्रपणे पार पाडण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना दिलेले शस्त्र परवाने तातडीने रद्द करण्यात यावेत, प्रकरणाची सुनावणी ट्रॅक कोर्टात करण्यात यावी, परळी औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचा तपास करावा, सर्व जाती-धर्मातील जबाबदार व्यक्तींनी पुढाकार घेऊन सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे.