32.4 C
Latur
Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्रराज्याला नऊ भौगोलिक मानांकने

राज्याला नऊ भौगोलिक मानांकने

तुळजापूरची कवडी, जालन्याची ज्वारी, कास्तीच्या कोथिंबिरीचा समावेश

लातूर : राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाबीसाठी देण्यात येणा-या भौगोलिक मानांकनामध्ये या वेळी बदलापूर, बाहडोळीची जांभळे, पेणच्या गणेशमूर्ती, लातूर जिल्ह्यातील कास्ती या गावची कोथिंबीर, निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील चिंच आणि बोरसुरी येथील तुरीचा समावेश करण्यात आला आहे. जालन्याची दगडी ज्वारी, धाराशिव जिल्ह्यातील कुंथलगिरीचा खवा आणि तुळजापूरच्या कवडीला यामध्ये स्थान देण्यात आले आहे. राज्यातून पाठवलेल्या १८ प्रस्तावांना भौगोलिक मानांकन मिळावे, असे प्रयत्न सुरू होते.

कास्तीची कोथिंबीर : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील कास्ती भागातील कोथिंबिरीला एक प्रकारचा वेगळा सुगंध आहे. बासमती तांदूळ जसा असतो तसाच या कोथिंबिरीला वेगळा वास आहे. मुंबई, नागपूर या मोठ्या शहरांसह अन्य देशांतही कोथिंबीर निर्यात करण्यात येते.
बोरसुरी डाळ : निलंगा तालुक्यात बोरसुरी हे गाव आहे. येथील वरण प्रसिद्ध आहे. या भागात बोरसुरी वरणाची मेजवानी करण्यात येते. त्याला डाळ असे संबोधले जात असले तरी या गावातील वरणात टाकल्या जाणा-या मसाल्यामुळे याला नामांकन मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

पानचिंचोलीची चिंच : पानचिंचोली या गावातील चिंचेचा आकार सहा ते आठ इंचांपर्यंत असतो. गेल्या ३०० वर्षांपासून या गावातील चिंच प्रसिद्ध आहे. या वेळी त्याची वैशिष्ट्ये मांडण्यात आली. लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी या कामासाठी विशेष लक्ष घातले होते. येथील पातडी चिंच उत्पादक संघाच्या वतीने व बोरसुरी येथील तूर डाळ उत्पादक संघाने बोरसुरी तूर डाळ विशेष भौगोलिक मानांकन मिळावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे या तीन वाणाला आता देशभर वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

कुंथलगिरीचा खवा : धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. कुंथल या शब्दाचा अर्थ कुरळा असा होतो. हा भाग डोंगराळ आणि कुरळ्या केसाच्या आकाराचा असल्याने येथे जनावरांची संख्या अधिक आहे.

तुळजापूरची कवडी : तुळजापूरला येणारे भाविक कवड्यांची माळ घालतात. कवडी स्त्री देवतांचे उपासक आवर्जून वापरतात. शिवाजी महाराज हे गळ्यात कवड्यांची माळ घालत.

जालन्याची ज्वारी : ही ज्वारी टणक असून, पक्ष्यांना सहजपणे फोडता येत नाही. या भागातील ज्वारी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी पुणे येथील गणेश हिंगमिरे जीआय नामांकन क्षेत्रात काम करतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR