परंडा : प्रतिनिधी
येथील रा. गे. शिंदे महाविद्यालयतील विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी वर्षा भारत खरात हिचा ४ एप्रिल रोजी महाविद्यालयात आयोजित निरोप समारंभातच भाषणादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. महाविद्यालयाचा निरोप घेताना तिने जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
माढा तालुक्यातील नाडी येथील रहिवासी वर्षा खरात(वय २०) हिने १० वी नंतर परंडा येथील रा. गे. शिंदे महाविद्यालयात ११ वी मध्ये प्रवेश घेतला होता. महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या पदवी विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना ४ एप्रिल रोजी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या निरोप समारंभात वर्षा खरात आपल्या मित्र परिवाराशी संवाद साधत असताना अचानक तिला हृदयविकाराचा झटका बसल्याने ती जागेवरच कोसळली.
अचानक झालेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून उपस्थितांनी तात्काळ तिला दवाखान्यात दाखल केले. परंतु तपासणी करून डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. वर्षा हिने महाविद्यालयास निरोप देऊन या जगाचा निरोप घेतला अशी चर्चा नागरिकांमधून होऊन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. निरोप समारंभातील भाषणात हसतखेळत बोलत असताना वर्षाचे निधन झाल्याने जिवन हे क्षणभंगुर असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.
लहानपणीच झाली होती शस्त्रक्रिया
वर्षा हिला लहानपणापासूनच हृदयाचा त्रास होता. त्यामुळे ती तिसरी, चौथीमध्ये शिकत असताना १५ वर्षापूर्वी तिचे व्हॉल्व बदलण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तिचे हृदय कधीही बंद पडू शकते, असे त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले होते, अशी माहिती तिचे वडील भारत खरात यांनी अश्रू अनावर होत जड अंत:करणाने सांगितली.