पुणे : राज्यात तिसरी ते नववीच्या वर्गात शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. ही चाचणी शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत. १० ते १२ जुलै या कालावधीत पायाभूत चाचणी घेण्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे देण्यात आले आहेत.
पायाभूत चाचणीत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या विषयांचा समावेश आहे. स्टार प्रकल्पांतर्गत राज्यात नियतकालिक चाचण्या घेण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार वर्षभरात तीन नियतकालिक चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन एक व दोन अशा चाचण्या प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त झाली आहे
हे जाणून घेणे हा चाचण्यांचा मुख्य उद्देश आहे. यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाचे आयोजन करणे हा उद्देश असणार आहे. ऑक्टोबर २०२४ चा शेवटचा आठवडाकिंवा नोव्हेंबरचा पहिला आठवडा या कालावधीत संकलित मूल्यमापन चाचणी एक, तर एप्रिल २०२५ चा पहिला आठवडा अथवा दुसरा आठवडा या कालावधीत संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन घेण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा कसे याची पडताळणी करण्यासाठी व अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने पायाभूत चाचणीचे नियोजन करण्यात आले आहे.
मूलभूत क्षमतेचा विचार होणार
या चाचण्या दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेप्रमाणे असणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त ताण देण्यात येऊ नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत. ही चाचणी एकूण दहा माध्यमांमध्ये घेण्यात येईल. या चाचणीसाठी विद्यार्थी सध्या ज्या वर्गात शिकत आहेत त्या इयत्तेच्या अगोदरच्या इयत्तेचा अभ्यासक्रम, अध्ययन निष्पत्ती व मूलभूत क्षमता यांचा विचार करण्यात आलेला आहे.
प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षणतर्फे प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार आहेत. तालुकास्तरावर पुरविण्यात येणा-या प्रश्नपत्रिका कोणत्याही परिस्थितीमध्ये फोटोकॉपीसाठी अथवा इतर साहित्यही बाहेर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
नियोजीत वेळेतच परीक्षेचे नियोजन
शाळा प्रश्नपत्रिका परीक्षेच्या दिवशी वेळापत्रकाप्रमाणे वापरात आणतील याबाबत काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पायाभूत चाचणीसाठी वेळापत्रक निर्धारित करून देण्यात आले आहे. १० जुलैला तिसरी ते सहावीसाठी ५० गुण, सातवी ते नववीसाठी ६० गुणांची चाचणी प्रस्तावित करण्यात आली आहे. यासाठी तिसरी ते सहावीला ९० मिनिटे व सातवी ते नववीसाठी १२० मिनिटे वेळ दिला जाणार आहे.