21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात आत्महत्यांचे सत्र थांबेना

राज्यात आत्महत्यांचे सत्र थांबेना

मुंबई : राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबताना दिसत नाही. राज्य सरकारने शेतक-यांसाठी आपण अनेक उपाययोजना केल्याचा दावा केला असला, तरी जानेवारी आणि फेब्रुवारी २०२४ या दोन महिन्यांत राज्यात ४२७ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. विदर्भात सर्वाधिक २३० शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
दरम्यान, राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही थांबताना दिसत नाही. राज्य सरकारने शेतक-यांना पीक कर्जमाफीसह पीक विमा आणि अन्य योजनांपासून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही शाश्वत उपाययोजना नसून वरवरच्या मलमपट्टीने शेतक-यांचे प्रश्न सुटत नाहीत, असे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.

जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले. यामध्ये विदर्भात अनेक शेतक-यांनी आपले जीवन संपवले आहे. पश्चिम विदर्भात १७५ शेतक-यांनी, पूर्व विदर्भात ५४ शेतक-यांनी आणि मराठवाड्यात १४६ शेतक-यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. अमरावती महसूल विभागात अमरावती ४८, अकोला ३३, यवतमाळ ४८, बुलडाणा ३४ आणि वाशिम येथे बारा शेतक-यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकार दरबारी असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर यांनी सांगितले.

विदर्भात सर्वाधिक आत्महत्या
नागपूर विभागात वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक २९, चंद्रपूर जिल्ह्यात १७, नागपूर जिल्ह्यात ७ आणि भंडारा जिल्ह्यात एका शेतक-याने आत्महत्या केली आहे. मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३३ शेतक-यांनी, नांदेडमध्ये २९, धाराशिव जिल्ह्यात २७, जालना २१, लातूर जिल्ह्यात १०, परभणी जिल्ह्यात ६ आणि हिंगोली जिल्ह्यात ४ शेतक-यांनी दोन महिन्यांत आत्महत्या केल्या. नाशिक महसूल विभागात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ३० शेतक-यांनी आत्महत्या केली आहे, तर धुळे जिल्ह्यात आठ आणि अहमदनगर जिल्ह्यात सात शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील केवळ सोलापूर जिल्ह्यात ४ शेतक-यांनी आत्महत्या केली असून, कोकण विभागात एकाही शेतक-याने आत्महत्या केलेली नाही.

अपुरी नुकसानभरपाई
गेल्या दोन महिन्यांत आत्महत्या केलेल्या सुमारे ४२७ शेतक-यांपैकी ६२ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब नुकसानभरपाईसाठी पात्र झाले आहेत. तर, २३ कुटुंब अपात्र ठरवण्यात आले आहेत. ४२७ पैकी ३२७ आत्महत्याग्रस्त कुटुंबांची प्रकरणे प्रलंबित असून आतापर्यंत केवळ ४० आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सरकारमार्फत नुकसानभरपाई देण्यात आली असल्याची माहिती धारूरकर यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR