नागपूर : राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील शहरांमध्ये केली जात असून गत ३ दिवसांपासून सातत्याने तापमानाचे नवे उच्चांक गाठले जात आहेत. पारा सातत्याने वाढतच चालल्यामुळे वाढत्या उन्हात नागरिकांची होरपळ होत आहे. दरम्यान, प्रादेशिक हवामान खात्याने येत्या २ दिवसांत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने ३१ मार्चच्या पत्रकार परिषदेत यावर्षी संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील व मध्य भारतात याचा अधिक प्रभाव राहील असे सांगितले होते. हा अंदाज खरा ठरत आहे. त्यात विदर्भात सध्या सरासरीच्या चार अंश सेल्सिअसपर्यंत पेक्षा जास्त तापमान आहे. विदर्भातील सर्वच शहरांमधील तापमान ४० अंश सेल्सिअसपलीकडे पोहोचले आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यात सातत्याने वाढ होत असून अकोला शहरात सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सोमवारी करण्यात आली. इतरही शहरांमध्ये ४१, ४२, ४३ अंश सेल्सिअसपलीकडे तापमान केले आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचे आवाहन केले आहे.
बुधवार दि. ९ एप्रिलला आणि गुरुवारी १० एप्रिलला विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्याची उपराजधानी आणि विदर्भाची राजधानी अशी ओळख असलेल्या नागपूर शहरात देखील कमाल तापमानाचा पारा सोमवारी ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचला. येत्या काही दिवसात तो ४५ अंश सेल्सिअस गाठण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज खरा ठरण्याची शक्यता आहे.
वातावरणात कमालीचा बदल
बदलत्या वातावरणामुळे राज्यातील तापमानात वाढ होत आहे. मध्यभारतासह आणि उत्तर-पश्चिम राज्यासह संपूर्ण महाराष्ट्रात येत्या ३ दिवसांत कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत असला तरीही मुंबईसह ठाणे शहरात देखील तापमान वाढ होत आहे. सोमवारी ठाण्यात देखील ४२ अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली. येत्या काही दिवसात त्यात आणखी वाढ होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील इतर शहरांसोबतच ठाण्यातही उष्णतेची लाट जाणवत आहे.