पुणे : प्रतिनिधी
अध्यात्म आणि विज्ञानाचे एकत्रिकरण केल्यास भारताला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देता येऊ शकते. परंतू युवकांमध्ये वाढत जाणारी व्यसनाधिनतेला थांबवून त्यांना भक्तीची नशा लावावी. हे कार्य केवळ वारकरी संप्रदायच करू शकते. ज्ञानोबा-तुकोबांच्या विचारांवर जेव्हा युवक चालेल तेव्हाच भारत विश्वगुरू बनेल असे विचार चाणक्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन, पुणे’ व ‘एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद’ यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमानवाडी आळंदी (देवाची) येथील डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल येथे आयोजित दोन दिवसीय ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’चे उद्घाटन द्विप प्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी देहूचे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बापूसाहेब महाराज मोरे, खांडबहाले डॉट कॉम चे निर्माते डॉ. सुनिल खांडबहाले, पद्मश्री पोपटराव पवार व मुंबई येथील श्रीसंत नामदेव महाराज कीर्तन महाविद्यालयाचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज पाटील हे प्रमुख पाहुणे तर अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. या गोलमेज परिषदेचे संकल्पक डॉ. राहुल विश्वनाथ कराड हे ही उपस्थित होते. तसेच यशोधन महाराज साखरे, रामकृष्ण महाराज, परिषदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील व राष्ट्रीय सरपंच संसदेचे सह समन्वयक प्रकाश महाले हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शलिनी टोणपे यांनी केले.