नवी दिल्ली : देशात पुन्हा स्वाईन फ्लूचा धोका निर्माण झाला आहे. एच१एन१ व्हायरसचे संक्रमण वाढत आहे. देशातील आठ राज्यांमध्ये स्वाईन फ्लूचा प्रसार वेगाने होत आहे. जानेवारी २०२५ मध्ये १६ राज्यांमधील ५१६ जणांना स्वाइन फ्लू झाला. त्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूमुळे सर्वाधिक मृत्यू केरळमध्ये झाले आहेत. या ठिकाणी चार जणांचा मृत्यू जानेवारी महिन्यात झाला आहे.
त्यानंतर कर्नाटक, हिमाचल प्रदेशात एक-एक जणाचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) च्या अहवालानुसार दिल्ली, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमधील परिस्थिती गंभीर आहे. ताप, थकवा, भूक न लागणे, खोकला, घसा खवखवणे, उलट्या आणि जुलाब ही स्वाईन फ्लू या आजाराची लक्षणे आहेत. स्वाईन फ्लूमुळे श्वसन प्रणालीवर परिणाम होतो. कोरोनाप्रमाणेच यामध्ये एका व्यक्तीला दुस-या व्यक्तीला संक्रमित करण्याची क्षमता देखील आहे.
भारतात २००९ मध्ये पहिल्यांदा स्वाईन फ्लूचा रुग्ण मिळाला होता. २००९ ते २०१८ पर्यंत स्वाईन फ्लूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण भारतात अधिक राहिले आहे. आधी हा आजार डुकरांमध्ये आढळत होता.
महाराष्ट्रात २१ रुग्ण
तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, गुजरात, कर्नाटक आणि दिल्ली या राज्यांमध्ये स्वाईन फ्लूबाबत निगराणी वाढवण्याचे आवाहन एनसीडीसीकडून करण्यात आले आहे. तामिळनाडूमध्ये २०९, कर्नाटकात ७६, केरळमध्ये ४८, जम्मू आणि काश्मीरमध्ये ४१, दिल्लीत ४०, पुद्दुचेरीमध्ये ३२, महाराष्ट्रात २१ आणि गुजरातमध्ये १४ रुग्ण आढळले आहेत.
मागील वर्षी ३४७ जणांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एनसीडीसीने अहवाल दिला आहे. त्या अहवालात म्हटले आहे की, २०२४ मध्ये २० हजार ४१४ लोकांना स्वाईन फ्लूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी ३४७ जणांचा मृत्यू झाला. या अहवालानुसार, २०१९ मध्ये सर्वाधिक २८,७९८ प्रकरणे नोंदवली गेली. त्यात १,२१८ लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकारच्या आजारासाठी केंद्र सरकारने आधीच एक टास्क फोर्स तयार केला आहे. टास्क फोर्समध्ये आरोग्य मंत्रालय, एनसीडीसी, आयसीएमआर, दिल्ली एम्स, पीजीआई चंडीगढ, निम्स बंगळुरूसह विविध विभागातील अधिकारी आहेत. एच१एन१ हा एक इन्फ्लूएंजा व्हायरस आहे. त्याला स्वाइन फ्लू नाव दिले आहे.