सोलापूर : ट्रॅक्टरची डीलरशिप मिळवून देतो असे सांगून १६ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी, तिघांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्यवहार ऑनलाईन ट्रान्झेक्शनद्वारे झाला होता. योगेश बाबू दिवेकर (वय ३३, रा. उत्कर्षनगर विजापूर रोड, सोलापूर) यांना त्यांच्या ओळखीचे संजय राजन यांनी डीलरशिपसाठी ऑफर आहे, असे सांगितले होते.
संजय राजन यांनी एका ट्रॅक्टर कंपनीचा एरिया मॅनेजर असलेल्या त्यांच्या मित्राकडे नेले, तेव्हां त्यांनी ट्रॅक्टर कंपनीच्या डीलरशिपची ऑफर दिली. ऑफर मिळाल्याने डीलरशिपपोटी १० मार्च २०२२ रोजी योगेश दिवेकर यांनी तीन लाख रुपये दिले. त्यानंतर एरिया मॅनेजरने परंडा येथील डीलरच्या मालकाकडून सबडीलर म्हणून ट्रॅक्टर खरेदी विक्री करण्यासाठी १३ लाख ३० हजार रुपये घेतले. पैसे घेऊनदेखील योगेश दिवेकर यांच्याकडील ट्रॅक्टर खरेदी-विक्रीचीडीलरशिप काढून घेतली.
मात्र, त्यापोटी घेण्यात आलेली १६ लाख ३० हजार रुपयांची डिपॉझिट आजतागायत परत केली नाही. पैशाची मागणी केली असता, सातत्याने टाळटाळ केली जात असल्याची फिर्याद योगेश दिवेकर यांनी दिली आहे.
या प्रकरणी ऋषिकेश पटवारी (रा. दमाणीनगर), नितीन जाधव, प्रवीण बाळासाहेब करळे (रा. परांडा, जि. धाराशिव) या तिघांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.