37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरफूटपाथवर भाजी विकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार

फूटपाथवर भाजी विकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार

सोलापूर-
फूटपाथवर बसून बेकायदेशीर भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
विविध ठिकाणी फूटपाथवर अतिक्रमण करून विविध वस्तूंची विक्री करण्यात येत आहे. त्याचबरोबर काही परिसरात भाजी विक्रेत्यांनीही फूटपाथवरच आपला संसार मांडला आहे. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्यावतीने कारवाईची मोहीम राबविण्यात येते. परंतु फूटपाथ तसेच इतर ठिकाणी रहदारीला अडथळा येईल, असे अतिक्रमण पुन्हा केले जाते.

येत्या दोन दिवसांत शहरातील फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कारवाईची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. शहरातील फूटपाथ हे पादचारी लोकांसाठी असून ते पूर्णपणे मोकळे करुन देण्यात येतील, अशी माहिती महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिली.

मनपातर्फे शहरात विविध ठिकाणी भाजी मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांसाठी ओटे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, विजापूर रोड, सत्तर फूट रोड यासह विविध ठिकाणी भाजी मंडईतील ओट्यांवर भाजी विक्री न करता रहदारीस अडथळा येईल अशा प्रकारे फूटपाथवर व रस्त्यावर भाजी विक्री केली जाते. त्यांच्यावर यापूर्वीही कारवाई केली आहे. आता पुन्हा रहदारीस अडथळा करणाऱ्या भाजी विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. भाजीपाल्यासह सर्व साहित्य जप्त करण्यात येईल. प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे बनसोडे यांनी स्पष्ट केले.

हरिभाई देवकरण प्रशालेच्या लगत असलेल्या रस्त्यावर अनधिकृतपणे बांधण्यात आलेले गाळे पाडून घेण्यासंदर्भात संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे.या संदर्भात नगर रचना विभागाकडून अतिक्रमण विभागास अद्याप कोणतीही कारवाईची सूचना आलेली नाही. सूचना आल्यानंतर आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही बनसोडे यांनी स्पष्ट केले.

विजापूर रोडवरील झोन क्रमांक पाच अंतर्गत असलेल्या निर्मिती विहारमध्ये अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात आली. निर्मितीविहार सोसायटीच्या रस्त्यावर एकाने अनधिकृतपणे लावलेले फाटक काढण्यात आले. जेसीबीच्या साह्याने कट्टे व फरशा निष्कासित करण्यात आल्या. येथील अनधिकृतपणे लावण्यात आलेले दोन प्रवेशद्वार जप्त करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR