टोरंटो : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी भारतावर आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधला आहे. दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीयाचा समावेश असल्याचा दावा अमेरिकेने केला. त्यावर, पुरावे असल्यास त्यावर नक्की तपास करू, असे प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले. याच दरम्यान, अमेरिकेच्या इशा-यानंतर भारताचा सूर बदलला असल्याची खोचक विधान करत ट्रुडो यांनी भारताला डिवचले आहे.
ट्रूडो म्हणाले पन्नूच्या हत्येच्या कथित कटात भारतीय नागरिकाचा सहभाग असल्याबद्दल अमेरिकेने भारताला चेतावणी दिली, तेव्हापासून भारताचा कॅनडाशी असलेल्या संबंधांमधील कठोरपणा थोडासा कमी झाला. भारताला कदाचित हे लक्षात आले आहे की भारत नेहमीच आक्रमक भूमिका घेऊ शकत नाही. त्यामुळेच आता भारत सहकार्याची भूमिका मोकळेपणाने मांडत आहे, आधी त्या भूमिकेची कमी दिसून येत होती.
भारताला आता कळले आहे की कॅनडाविरुद्ध आक्रमक होण्याने प्रश्न सुटणार नाहीत. कॅनडाला सध्या या मुद्द्यावर भारताशी भिडण्याची इच्छा नाही. कॅनडाला फक्त आपल्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करायची आहे. आम्हाला भारतासोबत व्यापार करारावर काम करायचे आहे. आम्हाला इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजी पुढे नेण्यात उत्सुकता आहे. परंतु कॅनेडियन लोकांच्या हक्कांचे संरक्षण केले जाईल याची खात्री करणे आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. आम्ही कायद्याच्या कक्षेत काम करतो आणि तेच पुढेही करत राहू असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेच्या विधी विभागाने २९ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, भारतीय वंशाच्या निखिल गुप्ता याने न्यूयॉर्कमध्ये खलिस्तानी नेता पन्नूच्या हत्येचा कट रचला होता. गुप्ता यांना भारतीय अधिका-यांकडून सूचना मिळाल्या होत्या. निखिल गुप्ताला जूनमध्ये झेक प्रजासत्ताकमध्ये अटक करण्यात आली होती आणि त्याच्या अमेरिकेला प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे.