27.3 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रटोपे-लोणीकर वाद विकोपाला

टोपे-लोणीकर वाद विकोपाला

मुंबई : प्रतिनिधी
जालन्यात शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. आज जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणूक होती. या दरम्यान टोपे यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला. यात मोठे नुकसान झाले. त्यानंतर सायंकाळी लोणीकर आणि त्यांच्या बंधूच्या घरावर दगडफेक झाली. त्यामुळे दोन नेत्यांमध्ये चांगलाच वाद पेटला आहे.

जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली उभा असलेल्या राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात टोपे यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. गाडीवर दगडफेक झाल्यानंतर टोपे यांनी आ. बबनराव लोणीकर यांच्यावर थेट आरोप केला होता. लोणीकरांच्या कार्यकर्त्यांनी गाडीची तोडफोड करणे निषेधार्ह असल्याचे म्हटले होते. त्यानंतर या आरोपाला लोणीकर यांनीही उत्तर दिले होते. मात्र, त्यानंतर सायंकाळी लोणीकर यांंच्यासह त्यांच्या बंधूंच्या घरावर दगडफेकीचा प्रकार घडला. अचानक आलेल्या घोळक्याने ही दगडफेक केली. त्यावर लोणीकर यांनी टोपेंच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला.
जालना शहरातील बबनराव लोणीकर यांच्या घरासमोर सायंकाळी काही अज्ञात लोकांचा घोळका दाखल झाला आणि थेट दगडफेक सुरू केली. तसेच बाजूला असलेल्या लोणीकर यांच्या भावाच्या घरावरही दगडफेक केली. यात घराच्या काचा फुटल्या. दरम्यान, याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि जमावाला पांगविले. यावरून लोणीकर विरुद्ध टोपे असा वाद तापल्याचे पाहायला मिळत आहे.

टोपेंच्या भावाच्या घरावरही दगडफेक
राजेश टोपे यांची गाडी फोडल्याच्या घटनेनंतर आक्रमक झालेल्या टोपे समर्थकांनी लोणीकरांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप होत आहे. याची माहिती मिळताच लोणीकर समर्थक घटनास्थळी दाखल झाले आणि लोणीकरांच्या घराच्या बाजूला असलेल्या राजेश टोपे यांच्या भावाच्या घरावर लोणीकर समर्थकांनी दगडफेक केली. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR