वाशीम : जि. प. चे कर्तव्यदक्ष सीईओ वैभव वाघमारे यांची बदली करू नये, यासाठी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेल्या वाशीम जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाल्याने त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सीईओ वाघमारे यांची बदली करण्यात येणार नाही असे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मागील काही दिवसापासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या बदलीच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनांच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. कर्मचा-यांच्या या आंदोलनाला जिल्ह्यातील सामान्य नागरिकांनी तीव्र आक्षेप घेत वाघमारे यांना पाठिंबा दर्शविला होता. यासाठी समाज माध्यमातून वुई सपोर्ट सीईओ वाघमारे असे कॅम्पेनिंग चालवले गेले. सीईओ वाघमारे यांना कर्मचारी संघटनांचा विरोध आणि दुसरीकडे सीईओ यांना जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचा वाढता पाठिंबा, यामुळे संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला होता.
आज कर्मचारी संघटनेच्या आंदोलनामध्ये शिक्षक व ग्रामसेवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. याला प्रत्युत्तर देण्यासाठी वुई सपोर्ट सीईओ या ग्रुपच्या माध्यमातून संघटित झालेल्या तळागाळातील सामान्य लोकांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे दिले. यामध्ये जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी, राजकीय पक्षांनी सहभाग घेऊन सीईओ वाघमारे यांचे समर्थन केले.
कर्मचारी संघटनेकडे संख्या बळ आणि आर्थिक बळ मोठे असूनही वाशिमच्या सामान्य जनतेने त्यांना आंदोलन मागे घ्यायला भाग पाडले. धरणे आंदोलनकर्त्यांना नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून एका शिष्टमंडळाने महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सीईओ वाघमारे यांची बदली करण्यात येणार नाही असे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.