28.6 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeमहाराष्ट्रभाच्याचे प्रेत बघून आत्यानेही सोडला जीव

भाच्याचे प्रेत बघून आत्यानेही सोडला जीव

गडचिरोली जिल्ह्यातील घटना

गडचिरोली : येथून चामोर्शीकडे येणा-या रूग्णवाहिका व दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर रूग्णवाहिका चालक गंभीर जखमी झाला. ही घटना १४ मार्च रोजी म्हणजे धुळवडीच्या दिवशी सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान चामोर्शी महामार्गावरील नवेगाव रै. गावासमोर घडली. अमोल तानाजी दुधबळे (वय ३०, रा. नवेगाव रै) असे मृताचे नाव आहे. या अपघातात रूग्णवाहिका चालक अंकुश उमाजी सोमनकर हा गंभीर जखमी झाला आहे.

खासगी रूग्णवाहिका (एम. एच. ३४ ए. व्ही. २५६१ ) गडचिरोलीवरून चामोर्शीकडे जात होती, तर अमोल तानाजी दुधबळे हा दुचाकीने नवेगाव रै. वरून समोरच्या गावात जाण्यासाठी निघाला होता. भरधाव रूग्णवाहिकेमध्ये गॅस व इतर तांत्रिक अडचणी आल्यामुळे चालकाचा ताबा सुटला. गावच्या मुख्य द्वाराजवळ समोरून येणा-या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक अमोल दुधबळे यांच्या डोक्यावरून रूग्णवाहिकेचे चाक गेल्यामुळे तो जागीच ठार झाला.

या अपघातात रूग्णवाहिका चालक सोमनकर याचे हात पाय मोडले. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या अपघाताची गडचिरोली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

भाच्याचे प्रेत बघून आत्याचाही मृत्यू
भाचा अमोल दुधबळे याचा गावाजवळ अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्याची आत्या वनिता विलास बारसागडे (५०) हया घटनास्थळी पोहचली. भाचा जागीच ठार झाल्याचे पाहून तिला भोवळ आली. घरी जाताच तिच्या छातीत दुखून हृदयाचा त्रास सुरू झाला. उपचारासाठी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

दोघांच्या मृत्यूने आप्तेष्ट गहिवरले
मृत अमोल तानाजी दुधबळे यांचा मागील वर्षी लग्न झाला असून त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व एक लहान मुलगा आहे. तर मृत वनिता विलास बारसागडे यांच्या पश्चात पती, दोन मुले व मुलगी आहे. दोघांवरही वैनगंगा नदीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी भाचा व आत्याचा अकाली मृत्यू झाल्यामुळे दोन्ही कुटुंबांवर मोठा आघात झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR