मुंबई/छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठवाड्यातील सर्व जिल्हे, पुणे, मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा धडाका सुरूच असून, गुरुवारी दुपारनंतर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या धारा सुरूच होत्या. त्यामुळे उन्हाळी पिके, भाजीपाल्यासह फळबागांची प्रचंड हानी होत असून, यंदा प्रथमच मे महिन्यात सलग ८ दिवस पाऊस कोसळत असल्याने शेतीची सर्व कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, सलग सुरू असलेल्या पावसामुळे लातूरसह अनेक ठिकाणी पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे.
मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांत पावसाचा रोजच धडाका सुरू आहे. छ. संभाजीनगरसह जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत असून, गुरुवारी दुपारनंतर मराठवाड्यातील ब-याच भागात अवकाळी पावसाने झोडपले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे नद्या, नाले, ओढे भरून वाहू लागले असून, काही ठिकाणी पूर स्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. लातूर जिल्ह्यात तर आपत्ती व्यवस्थापनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातही ब-याच भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतपिकांची प्रचंड हानी होत असल्याने शेतक-यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.
पश्चिम महाराष्ट्र, कोकणातही अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरमध्ये दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. आंबा बागायतदारांना पावसाचा मोठा फटका बसत आहे. पुणे, मुंबईतही पावसाचा जोर कायम आहे. यासोबतच विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस पडत असून, गुरुवारीही पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र राज्यात सर्वत्र पाहायला मिळाले. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मे महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. कमी दाबाच्या पट्टयाची तीव्रता वाढणार असल्याने पुढील ४ ते ५ दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होणार
पुढील ३६ तास अत्यंत महत्त्वाचे असून अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होत उत्तरेकडे सरकणार आहे. त्यामुळे कोकणपट्टीसह मुंबईत प्रचंड पाऊस होणार असल्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिला. पुढील २-४ दिवस गुजरात आणि महाराष्ट्र किनारपट्टी भागात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे.सध्या नैऋत्य मोसमी पावसाचे वातावरण तयार होत आहे. लवकरच मान्सून केरळात दाखल होईल. तत्पूर्वी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकण, गोवा, कर्नाटक व केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
लातूरमध्ये आपत्ती व्यवस्थापन सज्ज
लातूर जिल्ह्यात ९ दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीच पाणी झाले आहे. नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. त्यातच असाच पाऊस राहिला तर पूरस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे मांजरा, रेणा, तेरणा आणि तावरजा या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागही सज्ज झाला आहे.