पुणे : सुसंस्कृत म्हणवल्या जाणा-या पुण्यामध्ये भोंदूगिरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी एका तरुणाला महिलेचे पाय धुतलेले पाणी प्यायला दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या सगळ्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. या तरुणाची दीड लाख रुपयांची फसवणूक झाल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्पर्धा परीक्षेतील अपयशामुळे नैराश्याने ग्रासलेल्या तरुणाला पाय धुतलेले पाणी प्यायला देत दीड लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धानिर्मूलन समितीने हा प्रकार उघडकीस आणला आहे. तरुणाची फसवणूक करणा-या महिलेला तिच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. वृषाली संतोष ढोले असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. ही महिला कन्सल्टन्सीच्या नावाखाली भोंदूगिरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पाषाण परिसरात राहणा-या २३ वर्षांच्या तरुणाने तिच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली होती.
स्पर्धा परीक्षांतील अपयशामुळे या तरुणाला नैराश्य आले होते. सोशल मीडियावरील जाहिरात पाहून तो उपचारांसाठी वृषाली ढोले हिच्याकडे गेला. त्यानंतर त्याच्या समस्या अतिंद्रीय शक्तीद्वारे ओळखल्याचा दावा महिलेने केला. इतकेच नाही तर तुझे आयुष्य केवळ ३० वर्षांपर्यंत आहे असे सांगून तिने तरुणाला वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा करायला भाग पाडले. त्यानंतर वैशालीने त्याला राख खायला दिली. तसेच हातात एक गंडा देखील बांधला. गंडा न बांधल्यास त्याचा मृत्यू होईल अशी भीती देखील वैशालीने त्या तरुणाला दाखवली. तसेच त्याच्याकडून उपचारांच्या नावाखाली दीड लाख रुपये उकळले. हा संपूर्ण प्रकार महाराष्ट्र अंधश्रद्धानिर्मूलन समितीचे कार्यकर्ते विशाल विमल यांना कळला. त्यावेळी त्यांनी चतु:शृंगी पोलिसांना सोबत घेत या भोंदूगिरीचा पर्दाफाश केला.