मुंबई : अभिनेता इमरान हाश्मी सध्या त्याच्या ‘ग्राऊंड झिरो’ सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. इमरानचा हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमात इमरानने आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली आहे. इमरानचा सिनेमा रिलीज होण्याआधी पहलगाम हल्ला झाला. या हल्ल्यामुळे भारतातील तमाम नागरिकांना चांगलाच धक्का बसला. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत इमरानने पहलगाम हल्ल्याविषयी भाष्य केले आहे. दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे असे इमरान म्हणाला
इमरानने विशाल मल्होत्राला दिलेल्या मुलाखतीत याविषयी वक्तव्य केले. इमरान म्हणाला की, भारताची सुरक्षा यंत्रणा आणि त्याविषयी जी जाणकार मंडळी आहेत त्यांना याविषयी सविस्तर माहिती असेल. कारण आपली यंत्रणा खूप चांगली आहे. पहलगामच्या त्या भागात सुरक्षा असायला हवी होती, असाही एक प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु ते गवताचे मोठे मैदान आहे. त्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही किती जवान तैनात करणार. ते ठिकाण पर्यटनाचे प्रमुख केंद्र होते.
दहशतवाद्यांनी एक व्यवस्थित योजना आखून हा हमला केला. त्या ठिकाणी आजूबाजूला कोणताही रस्ता नव्हता. चांगल्या पद्धतीने प्लान करून दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आणि ते तिथून पळाले. हा अत्यंत भ्याड हल्ला होता. लवकरात लवकर आपल्याला या धक्क्यातून सावरायचे आणि त्या माणसांना सडेतोड उत्तर द्यायचे आहे.
जर त्यांनी आपली १० माणसे मारली तर आपण त्यांची ३० माणसे मारलीच पाहिजे, हीच युद्धाची रणनीती असते. जोवर आपण असे करणार नाही तोवर दहशतवाद्यांना धडा मिळणार नाही, अशाप्रकारे इमरानने त्याच्या भावना शेअर केल्या. इमरानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ग्राऊंड झिरो सिनेमाला प्रेक्षकांचा संमीश्र प्रतिसाद मिळत असून या सिनेमात इमरानसोबत सई ताम्हणकर, ललित प्रभाकर हे मराठी कलाकारही झळकत आहेत.