22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeछत्रपती संभाजीनगर...तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार

…तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार

जालना : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये जरांगे यांचा प्रभाव पाहायला मिळाला. त्यांच्या आंदोलनाचा मोठा फटका सत्ताधारी महायुतीला बसला आणि मराठवाड्यात महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळाले. जालन्यातील काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांनाही या आंदोलनाचा फायदा झाला आणि काळे यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांना पराभूत केलं. या पार्श्वभूमीवर नुकतीच कल्याण काळे यांची मनोज जरांगे यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. या भेटीवेळी मनोज जरांगे यांनी काँग्रेसलाही इशारा दिला आहे.

मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या विरोधात तुमच्या नेत्यांनी वक्तव्य केले तर मी विधानसभेला काँग्रेसचेही सर्व उमेदवार पाडून टाकेन, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. जरांगे यांच्या पहिल्या टप्प्यातील उपोषणावेळी काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगे यांच्या मागणीविरोधात भूमिका घेत ओबीसी एल्गार मेळाव्यांचे समर्थन केले होते. या पार्श्वभूमीवर आता जरांगे यांनी काँग्रेसलाही इशारा दिला आहे.

अंतरवाली सराटी इथे ८ जूनपासून पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज पुन्हा एकदा सरकारने आपल्या मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती केली आहे. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करावी या मागण्या त्यांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत. त्यामुळे जरांगे यांच्या या मागण्यांना आगामी काळात सरकारकडून कसा प्रतिसाद दिला जातो, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

अजित पवारांनी काय भूमिका घेतली आहे?
मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार काल म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझी एकत्रित चर्चा झाली आहे. सरकारकडून सगेसोयरे अधिसूचनेबाबत निर्णय घेण्यावर कोणी आणि काय बोलायचे, हे आमचे ठरले आहे. आगामी काळात आम्ही यात लक्ष घालून मार्ग काढू अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR