26.7 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeराष्ट्रीयतर भाजप कधीच जिंकला नसता

तर भाजप कधीच जिंकला नसता

रायबरेलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधींचे मोठे विधान

रायबरेली : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या दोन दिवस रायबरेली लोकसभा मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. या दरम्यान, विविध कार्यक्रमात सहभागी झालेल्या राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बहुजन समाज पार्टी आणि मायावतींसोबतच्या युतीबाबत मोठे विधान केले आहे. मायावती आमच्या सोबत असत्या तर भाजप कधीच जिंकू शकला नसता असे राहुल गांधी म्हणाले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून राहुल गांधी यांचा हा रायबरेली मतदारसंघातील चौथा दौरा आहे. लखनौ विमानतळावर उतरल्यानंतर राहुल गांधी रस्ते मार्गाने रायबरेली येथे पोहोचले. तिथे त्यांनी मारुती मंदिरामध्ये पूजा केली. त्यानंतर राहुल गांधी मूल भारती वसतीगृहात गेले. तिथे त्यांनी दलित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थ्याने राहुल गांधी यांच्याशी संवाद साधताना बसपाच्या प्रमुख मायावती यांचे कौतुक केले.

तो विद्यार्थी म्हणाला की, कांशीराम यांनी दलितांसाठी काम केले. त्यानंतर मायावती यांनी त्यांचं काम पुढे नेले. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, कांशीराम यांनी पाया रचला, तर मायावती यांनीही भरपूर काम केले असे मी समजतो. मात्र आजकाल त्या योग्य पद्धतीने निवडणूक लढवत नाही आहेत.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, मायावती यांनी आमच्यासोबत मिळून लोकसभेची निवडणूक लढवावी असे आम्हाला वाटत होते. मात्र त्यांनी काही कारणांमुळे आमच्यासोबत हातमिळवणी केली नाही. जर सपा, बसपा आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले असते तर भाजपा कधीही जिंकू शकला नसता. मायावती सोबत का नाही आल्या. जर त्या सोबत आल्या असत्या तर आम्ही जिंकलो असतो, अशी खंत राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR