बरेली : उत्तर प्रदेशमधील बरेली येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी मौलाना तौकिर रजा आणि त्याच्या संघटनेवर कारवाई केली आहे. दरम्यान, या हिंसाचारावेळी पोलिसांची हत्या करण्याचीही दंगेखोरांची योजना होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दंगलप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी नदीम याने पोलिस चौकशीमध्ये ही माहिती दिली आहे. या लोकांनी आमच्या नबीचा अवमान केला तर आपण फक्त पाहत राहणार का? याची एकच शिक्षा आहे ती म्हणजे शिरच्छेद, अशा घोषणा शुक्रवारी रस्त्यावर उघडपणे दिल्या जात होत्या.
पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील मुख्य आरोपी मौलाना तौकीर रजा याची संघटना असलेल्या आयएमसीचा नेता नदीम आणि त्याच्या सहका-यांनी जमावाला चिथावणी दिली. योजनाबद्ध रितीने हजारोंचा जमाव जमवण्यात आला. बाहेरूनही लोकांना बोलावण्यात आले. त्यांच्यामध्ये काही गुन्हेगारांचाही समावेश होता. तसेच त्यांच्याकडे बेकायदेशीर हत्यारेही होती.
दरम्यान, मौलाना तौकिर रजा याच्याविरोधात बरेली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून नदीम आणि त्याच्या सहका-यांनी चिथावणी दिल्यानंतर आज आम्ही आमचा हेतू साध्य करू. आज शहरातील वातावरण बिघडवायचे आहे, त्यासाठी पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, मुस्लिमांनी आपली ताकद दाखवली पाहिजे असे मौलाना तौकीर रजा यांनी सांगितले होते, असे सांगत जमाव पुढे शरकर होता, असा उल्लेख तौकीर रजाविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला होता.