24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रतर अग्रवाल कुटुंबाच्या महाबळेश्वरमधील फाईव्ह स्टार हॉटेलवर बुलडोझर फिरवा : मुख्यमंत्री शिंदे

तर अग्रवाल कुटुंबाच्या महाबळेश्वरमधील फाईव्ह स्टार हॉटेलवर बुलडोझर फिरवा : मुख्यमंत्री शिंदे

दरे(सातारा) : पुणे अपघातामुळे चर्चेत आलेल्या अग्रवाल कुटुंबाचे अनेक कारनामे बाहेर आले आहेत. अग्रवाल कुटुंबाने महाबळेश्वरमध्येही अनधिकृत बांधकाम केल्याचे समोर आले असून त्यांनी सरकारी जमिनीवर आलिशान पंचतारांकित हॉटेल उभारल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अग्रवाल कुटुंबाचे महाबळेश्वरमध्ये बेकायदेशीर हॉटेल असेल तर त्यावर बुलडोझर फिरवा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

अग्रवाल कुटुंबाने जर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधले असेल तर त्यावर बुलडोझर फिरवा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रशासन आता पुढे काय पाऊल उचलणार हे पाहावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावी तीन दिवस मुक्कामी असून माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आदेश दिले आहेत.

विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर कनेक्शन उघड झाले आहे. महाबळेश्वरमध्ये अग्रवाल यांनी शासकीय मिळकत भाड्याने घेवून या ठिकाणी फाईव्हस्टार दर्जाचे पंचातारांकित हॉटेल बांधले आहे. हे बांधकाम बेकायदेशीर असून शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून हे हॉटेल उभारण्यात आल्याचे निदर्शनात येत आहे. या बाबत महाबळेश्वर नगरपालिकेत तक्रारी दाखल करण्यात आली असून यावर अजूनही कारवाई झाली नाही. या पंचतारांकीत हॉटेलमध्ये एक बारही असल्याचे सांगण्यात येते. तसेच स्वत:च्या वापरासाठी दाखवण्यात आलेले हे हॉटेल पुन्हा दुस-यांना भाडेतत्वावर देण्यात आले आहे. यामुळे ज्या अग्रवाल कुटुंबातील व्यक्तीने दारु पिऊन दोघांचा जीव घेतला त्या कुटुंबाचा अनधिकृत बार कसा सुरू आहे असा सवाल महाबळेश्वरमधील नागरिक विचारत आहेत. तसेच शासनाला फसवून बांधण्यात आलेल्या या अनधिकृत हॉटेलवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, हे हॉटेल तात्काळ सील करुन शासन जमा करण्यात यावे अशी मागणी महाबळेश्वरमधील तक्रारदार आरटीआय कार्यकर्ते अभय हवालदार यांनी केली आहे.

महाबळेश्वर मध्ये लीज नंबर २३३ ही विशाल अग्रवाल यांच्या नावे असून त्यांच्या कुटुंबीयांची सुद्धा यात नावे आहेत. या ठिकाणी अनधिकृत बांधकामाच्या अनुषंगाने तक्रारी दाखल असून याबाबत खातरजमा करुन कारवाई करण्यात येईल असे महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR